Pune Land Scam: वेल्हे-राजगड परिसरात जमीन दलालांचा विळखा; शेतकऱ्यांची मोठी फसवणूक

बनावट दस्तऐवज, बेकायदा प्लॉटिंग आणि शेतकऱ्यांची फसवणूक वाढल्याने शेकडो भूमिपुत्र भूमिहीन होण्याच्या मार्गावर
Land Scam
Land ScamPudhari
Published on
Updated on

दत्तात्रय नलावडे

वेल्हे: राजगड, तोरणा, सिंहगड अशा गडकोटांसह पानशेत, वरसगाव, गुंजवणी धरण परिसराला जमीन दलालांनी विळखा घातला आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करून जमिनीची खरेदी-विक्री, कुलमुखत्यार, दस्त केले जातात. असे गंभीर प्रकार वाढल्याने शेकडो शेतकरी भूमिहीन झाले आहेत. या वाढत्या फसवणुकीच्या प्रकारांमुळे येथील शेकडो शेतकरी आता अल्पभूधारक किंवा भूमिहीन झाले आहेत.

Land Scam
Pune Metro Water Leakage Video: पुणे मेट्रो डब्यात पाणीगळतीचा व्हिडीओ व्हायरल

राजगड तालुक्यात बनावट दस्तऐवज तयार करून बेकायदेशीर जमीन विक्री करणाऱ्यांविरोधात वेल्हे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर शेवते म्हणाले की, जमीन खरेदी-विक्रीमध्ये फसवणूक झाल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. मात्र, यातील बहुतांश प्रकार दिवाणी स्वरूपाचे आहेत. काही प्रकारांत जमिनीच्या चार मालकांपैकी दोन मालक व्यवहार करतात. त्यामुळे प्रत्यक्ष फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात अडचणी निर्माण होतात.

Land Scam
Pune Police Extortion: पुण्यात खाकीला काळिमा; गुटखा वसुली प्रकरणात कारवाई

जमीन दलाल अथवा जमीन खरेदी करणाऱ्यांनी फसवणूक केली, त्या शेतकऱ्यांनी सातबारा उतारे, दस्तावेज आदी कागदपत्रांसह तक्रारी दाखल कराव्यात. पोलिस तपासात बेकायदा व्यवहार निष्पन्न झाल्यास तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन शेवते यांनी केले आहे.

तोरणा राजगड, सिंहगडच्या चोहोबाजूंना असलेल्या सह्याद्रीच्या डोंगररांगांतील या जमिनी गेल्या दोन-तीन वर्षांपासून एक ते पाच लाख रुपये प्रतिगुंठा दराने म्हणजे चाळीस लाख ते दोन कोटी रुपये प्रतिएकर भावाने प्लॉटिंग करून विकल्या जात आहेत. सिंहगड किल्ला परिसरात तोरणा आणि राजगडपेक्षा पाच ते दहापट अधिक बाजारभाव मिळत आहे.

Land Scam
NEET Paper Leak Case Update: नीट पेपरफुटी प्रकरणात नवे धक्कादायक खुलासे

बंगले, रिसॉर्टचे जाळे

वेल्हे बुद्रुक येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयात जमीन खरेदी-विक्री दस्तनोंदणीसाठी सुटीचे दिवस वगळता इतर दिवशी जमीन दलालांची मोठी वर्दळ असते. बेकायदा डोंगरटेकड्या फोडून घनदाट जंगल, झाडेझुडपे तोडून सपाटीकरण करून प्लॉटिंग केले आहे. रस्तेही केले आहेत. राजगड तालुक्यातील बहुतांश गावे हरित रेषेत आहेत. या ठिकाणी ठरावीक मर्यादेपर्यंतच घरासाठी बांधकाम करता येते. असे असताना छोट्या प्लॉटिंगमध्ये आलिशान बंगले, फार्म हाऊस तसेच अनेक ठिकाणी रिसॉर्ट, हॉटेलचे मोठे जाळे पसरले आहे.

जमिनी विकून भूमिपुत्रांचे स्थलांतर

20-25 वर्षांपूर्वी 50-60 एकर जमीन असणारी शेतकरी कुटुंबे जमीन विक्रीमुळे एकापाठोपाठ एक अल्पभूधारक, भूमिहीन होत आहेत. शंभर टक्के आदिवासी महादेव कोळी समाज असलेल्या रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील चांदर तसेच खाणू, टेकपोळे, माणगाव आदी गावांतील शेकडो एकर जमिनी राजकीय नेते, पुण्या-मुंबईतील धनदांडग्यांनी खरेदी केल्या आहेत. पिशवीसारख्या गावात दोन-तीनच कुटुंबे शिल्लक आहेत. जमिनी विकून तेथील भूमिपुत्र स्थलांतरित झाले आहेत. अशीच स्थिती केळद, मढे घाट, पिशवी, अठरागाव मावळसह पानशेत, वरसगाव धरण खोऱ्यात आहे.

Land Scam
Pune SRA TDR Scam: पुणे- पिंपरीत एसआरए टीडीआर घोटाळ्याचा पर्दाफाश

एकरी 12 लाखांना व्यावसायिकांना विक्री

राजगड किल्ल्याच्या पायथ्याच्या पाल बुद्रुक, पिंपरी, मेटपिलावरे आदी गावांतील मावळे भूमिपुत्र जमीन विकून अल्पभूधारक, तर काही भूमिहीन झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात वंशपरंपरेने कायम कसण्यासाठी दिलेल्या जमिनी एकरी दहा-बारा हजार रुपये अशा कवडीमोल किमतीने दहा-बारा वर्षांपूर्वी शेतकऱ्यांनी दलालांना विकल्या. दलालांनी या जमिनी दहा-बारा लाख रुपये एकर भावाने उद्योजक व्यावसायिकांना विकल्या.

कोकण रस्त्यांचा धनदांडग्यांना लाभ

या परिसरातून कोकणला जोडणारे घाटरस्ते होणार आहेत. या भागात राजकीय नेत्यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी शेकडो एकर जमिनी कवडीमोल किमतीने खरेदी केल्या आहेत. आता जनतेच्या पैशातून कोट्यवधी रुपये खर्च करून तयार करण्यात येणाऱ्या या रस्त्यांचा लाभ जमीन दलाल, राजकीय नेत्यांना होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news