Triple Seat Traffic Action Pudhari
पुणे

Pune Triple Seat Traffic Action: पुण्यात ट्रिपलसीट दुचाकीचालकांवर पोलिसांची धडक कारवाई

1,500 हून अधिक चालकांवर गुन्हे; 16.18 लाखांचा दंड वसूल, विशेष मोहीम सुरूच

पुढारी वृत्तसेवा

पुणे: बेशिस्त वाहनचालकांना लगाम घालण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. मंगळवारी (दि. 10) सकाळी दहा वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत तब्बल 1 हजार 500 पेक्षा अधिक ट्रिपलसीट दुचाकीचालकांवर पोलिसांनी कारवाई केली. 44 पोलिस ठाणी आणि 30 वाहतूक विभागाच्या माध्यमातून ही संयुक्त कारवाई करण्यात असून, यावेळी 16 लाख 18 हजार 400 रुपयांचा 2 हजार 144 चलनाद्वारे दंड वसूल करण्यात आला आहे.

याबाबत बोलताना अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी सांगितले. यापूर्वी ज्या दुचाकीचालकांवर गुन्हे दाखल आहेत. तसेच दुचाकीची कागदपत्रे नाहीत. तसेच विचित्र पद्धतीने दुचाकी चालवून एखाद्या व्यक्तीचा अशा दुचाकी चाकांमुळे अपघात होण्याची शक्यता होती. अशांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असून, त्यांच्या दुचाकी पोलिस जप्त करतील.

इतर दुचाकीचालकांवर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. ज्याप्रमाणे मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांची शाळा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पोलिस मुख्यालयातील मैदानावर घेतली, तशीच शाळा या दुचाकीचालकांची घेतली जाणार आहे.

बेशिस्त वाहनचालकांमुळे अपघातांना निमंत्रण मिळते. प्रामुख्याने मद्यप्राशन करून वाहन चालविल्याने गंभीर अपघात घडतात. तसेच विरुद्ध दिशने वाहन चालविल्यानेसुद्धा अपघात होतात. त्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी अशा वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी सकाळी दहा वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत शहरात सर्व ठिकाणी स्थानिक पोलिस ठाणी आणि वाहतूक विभागाच्या पथकांनी एकाच वेळी ट्रिपलसीट दुचाकी चालविणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली. पोलिसांनी ताब्यात घेतलेली वाहने कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरच पोलिस परत करणार आहेत.

पालकांनो, सतर्क व्हा!

पालकांकडून मुलांना दुचाकी दिली जाते. परंतु ही मुले वाहतूक नियमांचे पालन न करत ट्रिपलसीट, विरुद्ध दिशेने दुचाकी चालविणे, रॅश ड्रायव्हिंग असे प्रकार करतात. एखाद्या वेळी त्यांच्याविरुद्ध गुन्हा देखील दाखल होऊ शकतो. दुचाकी पोलिस जप्तसुद्धा करू शकतात. त्यावेळी पालकांना दुचाकी परत घेताना मुलाच्या वयाचा पुरावा, दुचाकीचा विमा, आरटीओ पासिंग, आरटीओकडील एनओसी, पालकांचा कबुलीनामा अशा कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे.

वाहनांचे मॉडीफिकेशन करणारे दुकानदार ‌‘रडार‌’वर

दुचाकीसह मोटारींमध्ये बदल घडवून कर्णकर्कश हॉर्न बसवणे, सायलेन्सरमध्ये फटाक्यासारखे आवाज बटण बसवणे, मोठमोठे हॉर्न बसवणाऱ्या दुकानदारांविरुद्धही कारवाईचा बडगा पोलिसांकडून उगारला जाण्याची शक्यता आहे. गैरप्रकारचे मॉडिफिकेशन करणाऱ्या दुकानावर कठोर कारवाई केली जाऊ शकते. वारजे माळवाडी परिसरात तब्बल सहा दुकानांविरुद्ध अशी कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांचे आवाहन

  • दुचाकीवर ट्रिपलसीटने प्रवास करणे हे कायद्याने गुन्हा आहे.

  • ट्रिपलसीटमुळे अपघात होण्याची शक्यता वाढते.

  • स्वतःसह रस्त्यावरील इतरांच्या जीवितास धोका निर्माण होतो.

  • नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे.

  • सुरक्षित व शिस्तबद्ध वाहन चालवावे.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. मद्यप्रान करून वाहन चालविणे, ट्रिपलसीट दुचाकी चालविणाऱ्यांच्या विरुद्ध कारवाई सुरू आहे. मंगळवारी सकाळी दहा वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत ट्रिपलसीट दुचाकीचालकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहेत. यापुढेदेखील अशीच कारवाई सुरू राहणार आहे.
अमितेश कुमार, पोलिस आयुक्त पुणे शहर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT