Police Pudhari
पुणे

Pune Police Transfer: ‘पुढारी’च्या वृत्ताची दखल; बंडगार्डन पोलिस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांची अखेर बदली

मुदतवाढ रद्द करून एकाची डेक्कन, तर दुसऱ्याची खडकी पोलिस ठाण्यात नियुक्ती; पोलिस आयुक्तांचा कठोर निर्णय

पुढारी वृत्तसेवा

पुणे: बंडगार्डन पोलिस ठाण्यास नेमणुकीस असलेल्या त्या दोन कारभाऱ्यांची अखेर उचलबांगडी करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी या बाबतचे आदेश दिले आहेत. दै. ‘पुढारी’ने तुळापूर येथील प्रोजेक्ट एक्स पार्टीला त्या कारभाऱ्यांची हजेरी या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करून याबाबत लक्ष वेधले होते. याच वृत्ताची दखल घेत या दोन कारभाऱ्यांची बदली केली आहे. एकाला डेक्कन तर दुसऱ्याला खडकी पोलिस ठाण्यात नेमणूक देण्यात आली आहे.

पोलिस दलातील कथीत वसुलीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी अलिकडच्या काळात अनेक पोलिस कर्मचाऱ्यांची उचलबांगडी करत कठोर भूमिका घेतली आहे. मात्र, त्याच वेळी बंडगार्डन पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या या दोन पोलिस कर्मचाऱ्यांची कोथरूड पोलिस ठाण्यात झालेली बदली रद्द करून त्यांना पुन्हा एक वर्षासाठी बंडगार्डन पोलिस ठाण्यातच मुदतवाढ दिली होती. मात्र, आता त्या दोघांची मुदतवाद रद्द करून बदली केली आहे.

दोन्‍ही कारभाऱ्यांवर बंडगार्डन पोलिस ठाण्यातील वजनदार कर्तव्याची जबाबदारी होती. मिल्सच्या ‘विशाल-सागरात’ हे दोघे अनेक वर्षांपासून प्रोटेक्शन मनीच्या दर्शनाने ओलेचिंब होत होते. दोघांच्या खांद्यावर जरी वेगवेगळी जबाबदारी असली तरी प्रत्यक्षात मात्र हा ‘विशाल-सागर’ एकच आहे. खरेतर ‘विशाल-सागरा’च्या त्या कर्तव्याचे ‘साग्रसंगीत’ पोलिस आयुक्तांच्या कानावर गेल्याने त्यांना ही मैफिल अर्धवटच सोडावी लागल्याची चर्चा आहे. दोन्‍ही कारभाऱ्यांचा बंडगार्डन पोलिस ठाण्यातील कार्यकाळ संपल्यानंतर त्यांची वार्षिक सर्वसाधारण बदल्यात १८ जून रोजी कोथरूड पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली होती.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वतः भरवलेल्या दरबारात या दोघांच्या बदल्या केल्या. लष्कर, फरासखाना, कोरेगाव पार्क पोलिस ठाणे तसेच एक वर्षासाठी बंडगार्डन पोलिस ठाण्यात मुदतवाढ यांनी मागितली होती. यातील एका कारभाऱ्याला बंडगार्डन पोलिस ठाण्यात एक वर्षासाठी मुदतवाढ दिली. मात्र, त्याच वेळी आयुक्तांच्या लक्षात हा मुदतवाढीचा प्रकार आला. तोपर्यंत हे कारभारी हॉलच्या दरवाजापर्यंत आनंदात डुलत-डुलत निघाले होते. तेवढ्यात पाठीमागून आवाज आला अन्‌ कारभारी थांबले. त्यांना परत बोलावून घेऊन आयुक्तांनी तुम्ही कोथरूड पोलिस ठाण्यात जा, असे सांगून त्यांची बदली तेथे केली. त्याचवेळी दुसऱ्या कारभाऱ्यांचीही कोथरूड पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली.

खरेतर मिल्सच्या आवारात गुंतलेले दोन्ही‍ कारभाऱ्यांचे मन काही केल्याने कोथरूड पोलिस ठाण्याकडे जाण्यास तयार नव्हते. दोघांना मिल्स परिसरातील ‘साग्रसंगीताची’ चांगलीच सवय लागली होती. बदलीनंतर देखील या दोघांना बंडगार्डन पोलिस ठाण्यातून कार्यमुक्त केलेले नव्हते. तेवढ्यात विनंती बदल्याबाबत अर्ज मागविण्यात आले. कारभाऱ्यांनी परत विनंती बदलीसाठी अर्ज केले. २९ जूनच्या आदेशात दोघा कारभाऱ्यांना चक्क बंडगार्डन पोलिस ठाण्यात मुदवाढ देण्यात आली होती. दरम्यान दै. ‘पुढारी’ने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध करताच मुदतवाढीचा हा प्रकार वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या लक्षात आला. त्यानंतर दोघांची मुदतवाद रद्द करून त्यांच्या बंडगार्डन पोलिस ठाण्यातून उचलबांगडी करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT