पुणे

Pune Police: पोलिसांचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; चार प्रभारींना आयुक्तांचा दणका

डमी तक्रारदारामार्फत प्रतिसादाची लिटमस टेस्ट

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पोलिस ठाण्यात तक्रार घेऊन येणाऱ्या नागरिकांना पोलिसांकडून तातडीने प्रतिसाद मिळतो की नाही, याची प्रत्यक्ष पडताळणी करण्यासाठी पाठवलेल्या डमी तक्रारदारांना पोलिसांनी ना दाद दिली, ना त्यांची फिर्याद घेतली नसल्याचे वास्तव समोर आले आहे.

कुठे तक्रारदाराला ऑनलाइन एफआयआर नोंदवण्यास सांगण्यात आले, तर कुठे ‘उद्या या’ म्हणून परत पाठवले, तसेच कुठे घटनास्थळाची पाहणी करूनही तक्रार नोंदवून घेण्यात आली नाही.

दरम्यान, या लिटमस्ट टेस्टची गंभीर दखल घेत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी संबंधित पोलिस ठाण्याच्या चौघा प्रभारी अधिकाऱ्यांना ‘ताशेरे ओढणे’ ही शिक्षा सुनावली आहे. अधिकारी, अंमलदारांवर प्रभारी अधिकाऱ्यांचे नियंत्रण नसल्याचे पोलिस आयुक्तांनी म्हटले आहे.

खरे तर अनेकदा तक्रारदारांना आपली कैफित पोलिसांकडे मांडण्यासाठी हेलपाटे मारावे लागतात. कधी-कधी तर एकाद्या पुढाऱ्याचा किंवा पोलिस अधिकाऱ्यांचा फोन प्रभारी अधिकाऱ्यांना आणावा लागतो. त्याला काही पोलिस ठाणी अपवाद देखील असतील. मात्र, बहुतेक ठिकाणचे हेच वास्तव असल्याचे दिसून येते.

नागरिक पोलिस ठाण्यात तक्रार घेऊन गेल्यानंतर त्यांची तक्रार नोंदवून घेतली जाते का, त्यांना तातडीने प्रतिसाद दिला जातो का आणि संबंधित अधिकारी घटनास्थळी जाऊन आवश्यक कार्यवाही करतात का, याची प्रत्यक्ष पडताळणी करण्यासाठी पुणे पोलिसांकडून ६ जून २०२६ रोजी शहरातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये डमी तक्रारदार पाठवले होते.

या कारवाईत मार्केटयार्ड, अलंकार, स्वारगेट आणि डेक्कन पोलिस ठाण्यांमधील तक्रार निवारणाची पद्धत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तपासणीत समोर आली. मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात डमी तक्रारदाराने मोबाईल फोन हिसकावून नेल्याची तक्रार केली.

मात्र, तेथील पोलिसांनी ऑनलाइन एफआयआर नोंदवून त्याची प्रत सादर करण्यास सांगितले. अलंकार पोलिस ठाण्यातील प्रकारही वेगळा नव्हता. मोबाईल हिसकावल्याची तक्रार घेऊन गेलेल्या डमी तक्रारदाराची एफआयआर नोंदवण्याची तयारी तेथील महिला पोलिस कर्मचाऱ्याने दर्शवली नाही.

घटनास्थळाची पाहणी केली आणि सीसीटीव्ही तपासले; मात्र, पोलिस अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित राहिले नाहीत, तर स्वारगेट पोलिस ठाण्यात वाहनचोरीची तक्रार घेऊन गेलेल्या डमी तक्रारदाराला ‘उद्या या’ असे सांगण्यात आले. तसेच डेक्कन पोलिस ठाण्यात वाहन चोरीची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली.

मात्र, वाहनाची कागदपत्रे घेऊन दुसऱ्या दिवशी बालगंधर्व पोलिस चौकीत तक्रार देण्यास सांगितले. त्यामुळे तक्रारदाराची तातडीने नोंद घेण्याऐवजी त्याला दुसऱ्या दिवशी येण्यास सांगण्यात आल्याचे स्पष्ट झाले. या सर्व पार्श्वभूमीवर पोलिस ठाण्यात तक्रार घेऊन आलेल्या नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे देऊन त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे दिसून येते.

प्रभारींचे नियंत्रण नाही

पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून नागरिकांच्या तक्रारींची योग्य दखल घेणे, त्यांची लेखी नोंद करून घेणे आणि अधिनस्त अधिकारी-अंमलदारांकडून आवश्यक कार्यवाही करून घेणे ही संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. मात्र, डमी तक्रारदारांच्या प्रकरणात ही जबाबदारी पार पाडण्यात आल्याचे दिसून आले नाही. अधिनस्त अधिकारी आणि अंमलदारांवर प्रभारी अधिकाऱ्यांचे नियंत्रण नसल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT