Pune Dahi Handi 2026: थरांच्या विक्रमासाठी गोविंदांची कसून तयारी; सुरक्षेचा प्रश्नही कायम

दहीहंडीला अवघे दोन दिवस बाकी असताना पुण्यात गोविंदा पथकांच्या सरावाला वेग आला आहे. सात थरांपुढे मानवी मनोरा रचण्याची तयारी; गोविंदांच्या सुरक्षेचीही चिंता.
Pune Dahi Handi 2026
Pune Dahi Handi 2026Pudhari
Published on
Updated on

पुणे: दहीहंडी उत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने पुण्यात गोविंदा पथकांच्या सरावाला वेग आला आहे. सात थरांपुढे मानवी मनोरा रचण्याचा विक्रम करण्यासाठी काही पथके सज्ज झाली असून, त्यासाठी कसून सराव सुरू आहे.

शहरात सुमारे १४ गोविंदा पथके सक्रिय झाली असून, बारामती, इंदापूर, लोणावळा आदी ग्रामीण भागांतूनही पथके पुण्यात दाखल होणार आहेत. मात्र, उंच थर रचताना संभाव्य दुखापतींचा धोका लक्षात घेता गोविंदांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. गोविंदांसाठी हार्नेस, हेल्मेट, नी-कॅप आणि जॅकेट यांसारखी सुरक्षा साधने उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरत आहे.

पुण्यात गेल्या काही वर्षांत दहीहंडी उत्सवाचे आकर्षण वाढले असून, यंदाही दहीहंडीच्या दिवशी विविध भागांत हंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथके सज्ज झाली आहेत. वकील, महाविद्यालयीन विद्यार्थी, नोकरदार, शिक्षक अशा विविध क्षेत्रांतील व्यक्ती या पथकांमध्ये सहभागी आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने पथकांमध्ये १४ वर्षांवरील तरुणांचाच सहभाग असतो, असे पुणे शहर जिल्हा दहीहंडी असोसिएशनचे सचिव अमोल भोकरे यांनी सांगितले.

Pune Dahi Handi 2026
Pune Traffic Diversion: पुणेकरांनो लक्ष द्या! दहीहंडी-जन्माष्टमीसाठी दोन दिवस वाहतुकीत मोठे बदल

भोकरे म्हणाले, राज्य सरकारने दहीहंडीचा साहसी खेळात समावेश केला आहे. त्यामुळे उत्सवाच्या दिवशी विविध भागांतून मोठ्या संख्येने गोविंदा पथके शहरात येणार आहेत. त्यांच्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था, गर्दीच्या ठिकाणी चेंगराचेंगरी टाळण्यासाठी पुरेसा पोलिस बंदोबस्त आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी ॲम्ब्युलन्सची व्यवस्था असणे गरजेचे आहे. उंच थर रचताना गोविंदांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे. दहीहंडी उत्सवातील बक्षिसांच्या रकमेत वाढ करण्यात यावी.

पुण्यात उत्साहाचे वातावरण

शनिवारी (दि. ५) पुण्यात ठिकठिकाणी दहीहंडी उत्सव रंगणार आहे. शहर, उपनगरांसह मध्यवर्ती पेठा, कोथरूड, सहकारनगर, वानवडी, खडकी, छत्रपती शिवाजीनगर आणि डेक्कन परिसरात मंडळांची जोरदार तयारी सुरू आहे. उत्सवाच्या फ्लेक्सवर बक्षिसांच्या रकमेसह सेलिब्रिटींच्या उपस्थितीचीही चर्चा आहे. काही मंडळांकडून क्रेनद्वारे, तर काही ठिकाणी दोरीच्या साहाय्याने दहीहंडी बांधण्यात येणार आहे.

Pune Dahi Handi 2026
Pune Ganeshotsav: गणेशोत्सवात प्लाझ्मा, प्रेशर मिड आणि लेझर बंदीला पाठिंबा; साउंड ॲण्ड इलेक्ट्रिकल जनरेटर असोसिएशनची भूमिका

क्रेनमुळे हंडीची उंची ठरवणे सोपे

पूर्वी दोन इमारतींमध्ये दोरी बांधून त्यावर दहीहंडी लावली जात असे. आता अनेक ठिकाणी हंडी उंचावर नेण्यासाठी क्रेनचा वापर केला जात आहे. क्रेनच्या साहाय्याने हंडी आवश्यकतेनुसार वर-खाली करता येत असल्याने उंची नियंत्रित करणे आणि उत्सवानंतर हंडी खाली आणणे सोपे होते. त्यामुळे दोरीच्या तुलनेत क्रेनचा पर्याय अधिक सुरक्षित असल्याचे अमोल भोकरे यांनी सांगितले.

महिला पथकांचाही सराव सुरू

कसबा पेठेतील गोविंदा पथकांचा सराव अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. पुरुष गोविंदांसोबत दहीहंडी फोडण्यासाठी महिला गोविंदा पथकेही सज्ज झाली आहेत. कसबा पेठेतील जुनी जोगेश्वरी महिला गोविंदा पथक विशेष चर्चेत असून, कसबा पेठ, पर्वती आणि केशवनगर परिसरातील मुली व महिला या पथकात सहभागी आहेत.

आमच्या पथकाचा नियमित सराव सुरू असून, रोज ७० ते ८० गोविंदा सहभागी होतात. गोविंदांच्या सुरक्षेसाठी नी-कॅपसह सुरक्षा साधने वापरली जातात. थर रचताना खालील गोविंदा हात वर करून सज्ज असतात. त्यामुळे वरचा गोविंदा पडल्यास त्याला पकडता येते. क्रेनमुळे हंडीची उंची नियंत्रित करणेही सोपे होते.

- संजीव तारू, भोईराज दहीहंडी संघ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news