पुणे: पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून आलेल्या एका २३ वर्षीय तरुणाचा मैदानी चाचणी दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला . ही धक्कादायक घटना शिवाजीनगर येथील मैदानावर शनिवारी (दि. २८) सकाळी घडली. सोळाशे मीटर धावण्याची चाचणी देत असताना तिसऱ्या फेरीत त्याला अचानक 'फिट' आली. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. पुरुषोत्तम बारकुल (२३, रा. देऊळगाव राजा, जि. बुलढाणा) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
गेल्या काही दिवसांपासून शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर भरती प्रक्रिया राबवली जात आहे. सध्या कारागृह विभागाची भरती सुरु आहे . शनिवारी सकाळी पुरुषोत्तम याची मैदानी चाचणी सुरू होती. पोलीस भरतीतील अत्यंत कठीण टप्पा मानल्या जाणाऱ्या १६०० मीटर धावण्याच्या चाचणीत तो सहभागी झाला होता. दोन फेऱ्या पूर्ण केल्यानंतर, तिसऱ्या फेरीदरम्यान पुरुषोत्तमला अचानक 'फिट' (झटका) आली आणि तो धावता धावता मैदानावरच कोसळला.
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे मैदानावरील इतर उमेदवार आणि पोलीस प्रशासनाची धावपळ उडाली. पुरुषोत्तम कोसळल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या वैद्यकीय पथकाने त्याची प्राथमिक तपासणी केली. त्यावेळी त्याचे हृदयाचे ठोके अत्यंत मंदावले असल्याचे निदर्शनास आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्याला तातडीने रुग्णवाहिकेतून ससून सर्वोपचार रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी अंती त्याला मृत घोषित केले. पुरुषोत्तमच्या निधनामुळे बुलढाणा जिल्ह्यातील त्याच्या गावावर शोककळा पसरली असून, पोलीस दलातही या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे.