पुणे : पोलिसांनी एकाचवेळी तब्बल 400 मोबाईल नागरिकांना परत मिळून दिले आहेत. परिमंडळ एक आणि चारमधील गहाळ झालेले तसेच हरवलेले मोबाईल परत करण्यात आले आहेत. पोलिसांनी केलेल्या या कामगिरीने नागरिकांनी समाधान व्यक्त करत पोलिसांचे आभार मानले आहेत.
पोलिसांच्या सायबर आणि स्थानिक गुन्हे शोध पथकाने संयुक्तपणे केलेल्या तपासातून हे मोबाईल परत करण्यात आले आहेत. शहरात मोबाईल चोरीला जाण्याच्या घटना हजारोंमध्ये आहेत. पण, त्याची अनेकवेळा नोंद होत नाही. पोलिस देखील मिसींग दाखल करण्यास सांगतात. नागरिकांकडून सीईआयआर या पोर्टलवर हरवल्याची नोंद केली जाते. त्यानूसार पोलिसांकडून या नोंद केलेल्या मोबाईलचा तांत्रिक शोध घेतला जातो. गेल्या काही महिन्यांमध्ये पोलिस अशा पद्धतीने हरवलेले मोबाईल शोधत असल्याचे दिसत आहे.
त्यानुसार, परिमंडळ एक आणि चारमधील विविध पोलिस ठाण्याअंतर्गत नागरिकांनी “सीईआयआर” पोर्टलवर हरवलेल्या मोबाईलची नोंद केल्यानंतर त्याच्या आयएमईआय क्रमांकावरून शोधमोहीम राबविली. अनेक मोबाईल महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत तर काही मोबाईल वेगवेगळ्या राज्यांत कार्यरत असल्याचे समोर आले. लगेच त्या ठिकाणच्या पोलिसांशी संपर्क साधून मोबाईल परत मिळविले.
विशेष उपक्रमात परिमंडळ एकचे उपायुक्त कृषिकेश रावले यांच्या हस्ते 193 मोबाईल तसेच परिमंडळ चारमधील उपक्रमात अप्पर पोलिस आयुक्त मनोज पाटील, पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांच्या हस्ते 206 मोबाईल तक्रारदारांना परत करण्यात आले. पोलिसांनी नागरिकांना हरवलेले तसेच गहाळ झालेल्या मोबाईलसंदंर्भात तत्काळ सीईआयआर या पोर्टलवर नोंद करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, या कार्यक्रमात हरवलेला मोबाईल पुन्हा मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद दरवळत होता. नागरिकांचे पोलिसांचे मनापासून आभार मानले.