पुणे: शहरातील पदपथ, रस्त्यावरील हातगाड्या, स्टॉल, ठेले आणि पानटपऱ्या यांना रात्री दहा वाजेपर्यंतच व्यवसाय करण्याची परवानगी असताना अनेक ठिकाणी खाऊगल्ल्या मध्यरात्रीनंतरही सुरू राहत असल्याचे निदर्शनास आल्याने पुणे पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे.
शहरातील सर्व खाऊगल्ल्या रात्री दहाच्या ठोक्याला बंद करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. मागील आठवड्यात पोलिस आयुक्तांनी रात्रीच्या वेळी शहरातील विविध भागांना सलग दोन दिवस भेट देत कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला होता. या वेळी अनेक खाऊगल्ल्या रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचे तसेच तेथे अनियंत्रित गर्दी होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सार्वजनिक शांतता आणि वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होत असल्याचे पोलिसांचे मत आहे.
टेबल- खुर्च्या टाकून होणारा व्यवसाय करणार बंद
याबाबत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले, की परवानाधारक आस्थापनांना बंद करण्याचा उद्देश नाही. संबंधित परवानगीनुसार हॉटेल, रेस्टॉरंट, पब आणि बार सुरू राहतील. मात्र, पदपथावर किंवा दुकानाबाहेर टेबल- खुर्च्या टाकून होणारा व्यवसाय बंद करण्यात येईल.