Law Pudhari
पुणे

Pune Police Cash Robbery Case: पुण्यात पोलिसांवर दरोड्याच्या कटाचा आरोप; महिला हवालदारासह दोघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

एक कोटींच्या रोकड प्रकरणात न्यायालयाचा दणका; शिवापूर पोलिस चौकीत २६ लाखांवर डल्ल्याचा प्रयत्न केल्याचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

पुणे: एक कोटी रुपयांची रोकड घेऊन जाणाऱ्या व्यावसायिकाला पोलिस असल्याची बतावणी करून अडवणे, रोकड लुटण्याचा प्रयत्न करणे आणि त्यानंतर त्याला शिवापूर पोलिस चौकीत नेऊन तेथेही २६ लाखांच्या रोकडीवर डल्ला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या गंभीर प्रकरणात महिला पोलिस हवालदार प्रमिला शरद निकम आणि पोलिस हवालदार अजीज अब्बास इसुब मेस्त्री यांना पुणे सत्र न्यायालयाने दणका दिला. सत्र न्यायाधीश पी. आर. चौधरी यांनी दोघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला.

हर्षवर्धन भूषण पवार हे स्टेशनरीचा व्यवसाय करतात. १७ जुलै रोजी किरण आपटे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर चव्हाण एंटरप्रायझेसच्या मालकाला एक कोटी रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार १८ जुलै रोजी पवार कर्मचारी बाबू पवार यांच्यासह एक कोटींची रोकड घेऊन निघाले. पुढे पवार, आपटे आणि चव्हाण एंटरप्रायझेसचा प्रतिनिधी कारमधून नऱ्हेकडे रवाना झाले. नवले पुलाजवळ दुचाकीवरून आलेल्या दोघांनी कार अडवून 'आम्ही पोलिस आहोत; तुमच्याकडे काळा पैसा आहे,' असे सांगितले. रोकड हिसकावण्याचा प्रयत्न सुरू असतानाच किरण आपटे ७३ लाख ५० हजार रुपये घेऊन पसार झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. एका व्यक्तीने पवार यांच्या डोळ्यांत तिखट फेकून त्यांना जबरदस्तीने कारमध्ये बसविले आणि कार शिवापूर पोलिस चौकीकडे नेली.

चौकीत २६ लाखांवर डल्ल्याचा आरोप!

शिवापूर चौकीत संबंधित व्यक्ती स्वतःला पोलिस असल्याचे सांगत होती. याप्रकरणी पवार यांनी नऱ्हे पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार विक्रम चकणकर, अमेय, गणेश कदम आणि दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान प्रमिला निकम आणि अजीज अब्बास मेस्त्री यांची भूमिका समोर आली. तर या प्रकरणात एका पत्रकारालाही अटक केली आहे.

'खोट्या गुन्ह्यात गोवले'; बचाव पक्षाचा दावा

दोन्ही अधिकारी प्रतिष्ठित असून, पुरस्कारप्राप्त आहेत. फिर्यादी काळा पैसा घेऊन जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर कर्तव्य बजावत त्यांना चौकीत आणले. रोकड लुटण्याशी त्यांचा संबंध नसून, त्यांच्या ताब्यातून एक रुपयाही जप्त झालेला नाही. वैमनस्यातून त्यांना गोवण्यात आल्याचा दावा बचाव पक्षाने केला.

'दरोडा पूर्ण करण्यासाठी चौकीत आणले'

सरकारी पक्षाने मात्र जामिनाला तीव्र विरोध केला. अर्जदारांचा इतर आरोपींशी संबंध असून, त्यांनी आरोपींना माहिती पुरवली. दरोडा पूर्ण करण्यासाठीच फिर्यादीला चौकीत आणण्यात आल्याचा दावा सरकारी वकील पुष्कर सप्रे यांनी केला. लगतच्या हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये २६ लाख रुपयांची रोकड काढून कारमध्ये फेकल्याचे दिसत असल्याचेही सांगण्यात आले.

न्यायालयाचे कडक ताशेरे

सीसीटीव्ही फुटेज, एफआयआर आणि केस पेपर्स पाहिल्यानंतर न्यायालयाने आरोप गंभीर असल्याचे स्पष्ट केले. नवले पुलावर सुरू झालेला दरोड्याचा प्रयत्न शिवापूर चौकीतही सुरू राहिला आणि तेथे २६ लाखांची रोकड काढून घेण्याचा प्रयत्न झाल्याचे न्यायालयाने नमूद केले. 'शासकीय सेवेत असताना जनतेच्या हिताचे रक्षण करण्याऐवजी इतरांशी संगनमत करून दरोड्याचा प्रयत्न केल्याचे प्रथमदर्शनी दिसणे ही अत्यंत गंभीर बाब आहे,' असे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने दोघांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT