पुणे: खाकी वर्दीला जनतेच्या संरक्षणाचे कवच मानले जाते. मात्र, याच खाकीतील काही ‘साहेबां’ना लाचेची चटक लागल्याचे चित्र पुणे शहर पोलिस दलातील सलग कारवायांमुळे समोर आले आहे. चालू वर्षात शहर पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) लाचखोरीच्या आरोपावरून कारवाई केली आहे.
विशेष म्हणजे, यामध्ये दोन पोलिस उपनिरीक्षक आणि दोन सहायक पोलिस निरीक्षकांचा समावेश आहे. त्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांच्या तुलनेत अधिकारीच लाचखोरीच्या प्रकरणांत आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.
लोहगाव, लोणी काळभोर, आर्थिक गुन्हे शाखा आणि बंडगार्डन पोलिस ठाण्यात कार्यरत असताना या अधिकाऱ्यांवर एसीबीने कारवाई केली. पोलिस ठाण्यात तक्रार घेऊन येणाऱ्या नागरिकाला कायद्याचा आधार मिळावा, अशी अपेक्षा असते.
मात्र, त्याच कायद्याची भीती दाखवून पैशांची मागणी होत असेल, तर नक्कीच हे गंभीर आहे. खरंतर पोलिस आयुक्त अमितेश कुमार कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांनी अनेकदा आपल्या कृतीतून ते दाखवून देखील दिले आहे.
अर्थपूर्ण कर्तव्यापोटी गैरप्रकार करणाऱ्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर त्यांनी कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. प्रसंगी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, असे असताना देखील पोलिस अधिकारी लाचखोरीत अडकताना दिसून येत आहेत.
पीएसआयने मागितली एक लाखांची लाच
तक्रारदाराविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून बंडगार्डन पोलिस ठाण्यातील तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक संदीप खेडकर यांच्यावर एसीबीने कारवाई केली.
२८ लाखांच्या लाच प्रकरणात महिला अधिकारी
आर्थिक गुन्हे शाखेतील सहायक पोलिस निरीक्षक वैशाली तोटेवार यांना २८ लाख रुपयांच्या लाचप्रकरणात एसीबीने पकडले होते. पदोन्नतीनंतर त्यांची मुंबई लोहमार्ग येथे बदली झाली होती. पुणे शहर पोलिस दलातून कार्यमुक्त केल्यानंतरही त्यांना या प्रकरणात अटक करण्यात आली होती.
८० हजारांची लाच घेताना पीएसआय जाळ्यात
अदखलपात्र गुन्ह्यात मदत करण्यासाठी ८० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लोहगाव पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक मनोज मधुकर बरुरे यांना एसीबीने मे महिन्यात रंगेहाथ पकडले होते.
५० हजार घेताना एपीआयला पकडले
लोणी काळभोर पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक कृष्णा जनार्दन बाबर यांना ५० हजार रुपयांची लाच घेताना नुकतेच एसीबीने रंगेहाथ पकडले. फसवणुकीच्या गुन्ह्यात न्यायालयात लवकर आरोपपत्र दाखल करण्यासाठी त्यांनी लाच घेतल्याचा आरोप