Pune Police Extortion Case Pudhari
पुणे

Pune Police Extortion Case: प्राचार्यांना ब्लॅकमेल करून 7 लाखांची खंडणी; पीएसआयसह दोघांना अटक

बाललैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी; महिला पोलिस कर्मचारी अद्याप फरार

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) अजित बडे आणि पोलिस कर्मचारी सुदाम तायडे या दोघांना गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने शुक्रवारी (दि.15) अटक केली. तर, महिला पोलिस कर्मचारी सोनाली हिंगे अद्याप फरार आहे.

या तिघांवर मंगळवार पेठेतील एका नामांकित कॉलेजच्या प्राचार्यांना बाललैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक करण्याची भीती दाखवून, संस्थेची बदनामी करण्याच्या धाकाने ब्लॅकमेल करीत सात लाखांची खंडणी उकळल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तेव्हापासून हे तिघे फरार होते. त्यातील बडे आणि तायडे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी या तिघांवर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी बडतर्फीची देखील कारवाई केली आहे. शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील दामिनी पथकात काम करणाऱ्या सोनाली हिंगे हिची एका अल्पवयीन मुलीसोबत जिममध्ये ओळख झाली.

तिला चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने आपल्या जाळ्यात खेचले. पुढे त्याच मुलीचा वापर करून पीएसआय अजित बडे, सोनाली हिंगे आणि सुदाम तायडे या तिघांनी एका नामांकित कॉलेजच्या प्राचार्यांना ब्लॅकमेल करून सात लाखांची खंडणी उकळली. दरम्यान, ठरल्याप्रमाणे या तिघांनी त्या मुलीला कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला नाही. अगोदर ज्या कॉलेजमध्ये तिचा प्रवेश होता तोही रद्द झाला.

त्यामुळे त्या मुलीने आपल्या कुटुंबीयांना सोबत घेऊन थेट पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली. त्या वेळी या खंडणीखोरीच्या प्रकरणाला वाचा फुटली. पोलिसांनी प्राचार्यांना बोलावून घेतले. त्या वेळी त्यांनी या तिघांच्या कृत्याचा पाढा वाचला. पीएसआय बडे, कर्मचारी हिंगे आणि तायडे या तिघांच्या विरुद्ध प्राचार्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT