पुणे

पुणे : रिंगरोड विरोधातील आंदोलकांवर पोलिसांचा लाठीमार

अविनाश सुतार

राजगुरूनगर : पुढारी वृत्तसेवा : पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या रिंगरोडला विरोध दर्शविण्यासाठी खेड तालुक्यातील ९ गावातील बाधीत शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयात आज (दि. ८) आक्रमक आंदोलन करण्यात आले. यावेळी जाणीवपूर्वक गोंधळ निर्माण केल्याच्या आरोपातून आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. तसेच आंदोलकांना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला.

आंदोलना दरम्यान रिंग रोड विरोधी कृती समितीचे अध्यक्ष व मोईचे माजी सरपंच पाटीलबुवा गवारी तसेच त्यांच्या पत्नी व खेड पंचायत समितीच्या माजी सभापती कल्पना गवारी यांना पोलिसांनी अक्षरशः फरफटत ओढून नेऊन पिंजरा गाडीत बसवले. त्यांच्या बरोबर जे हाताला लागतील अशा जवळपास शंभर कार्यकर्त्यांना पकडून पोलिसांनी अटक केली. अटक केलेल्यात महिलांची संख्या मोठी आहे.

तब्बल दोन तास आंदोलक शेतकऱ्यांनी प्रांत कार्यालयात ठिय्या मांडून हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली. त्यावर प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांनी समर्पक उत्तर देऊन समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, आक्रमक शेतकरी घोषणा देत कोणाचे म्हणणे ऐकून घेत नव्हते. अखेर पोलिसांनी अटक करून सर्वांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. यावर महिलांनी पोलिसांना अडवले. यावेळी कार्यालयात घोषणाबाजी आणि आरडाओरड्यामुळे गोंधळ निर्माण झाला. पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची, ढकला ढकल झाल्याने तणाव निर्माण झाला.

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील, पोलीस निरीक्षक सतिशकुमार गुरव, उपनिरीक्षक राहुल लाड व मोजका पोलीस फौजफाटा प्रयत्न करीत होते. पण आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर तासाभराने केंद्रीय राखीव पोलीस दलाचे पथक पाचारण करण्यात आले. त्यानंतर थेट आंदोलकांना उचलून गाड्यांमध्ये बसवणे. आणि जे ऐकणार नाहीत, अशांवर लाठीमार सुरू केला. काहीच वेळात सर्व आंदोलकांना बाहेर काढून अटक करण्यात आली.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT