CID Pudhari
पुणे

Pune Poisonous Liquor Case Police Investigation: विषारी दारू प्रकरणात पोलिस-आरोपी संपर्काचा संशय; १५० कॉल्सचा खुलासा

सीआयडी तपासात धक्कादायक माहिती समोर; अवैध दारू व्यवसायाला संरक्षण दिल्याचा संशय अधिक गडद

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील विषारी दारू मृत्युकांडाच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी राधेश्याम हरिराम प्रजापती याच्याशी निलंबित करण्यात आलेल्या चार पोलिस कर्मचाऱ्यांनी तब्बल १५० वेळा दूरध्वनीवरून संपर्क साधल्याचे चौकशीत उघड झाले आहे.

त्यामुळे प्रजापतीच्या अवैध दारू व्यवसायाकडे संबंधित पोलिसांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले होते का, तसेच त्याला संरक्षण दिले जात होते का, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. विषारी दारू प्राशनामुळे २२ हून अधिक जणांचा मृत्यू झाल्यानंतर राज्यभर खळबळ उडाली होती.

त्यानंतर या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू करण्यात आला. तपासादरम्यान उरुळी कांचन येथील राधेश्याम हरिराम प्रजापती याला अटक करण्यात आली. त्याच्या मोबाईलसह इतर तांत्रिक पुराव्यांची छाननी करताना पोलिस दलातील काही कर्मचाऱ्यांशी त्याचे सातत्याने संपर्क असल्याचे समोर आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन पोलिस ठाण्यातील अजित काळे आणि सुमित वाघ, तसेच यवत पोलिस ठाण्यातील रामदास जगताप आणि सुभाष डोईफोडे या चार कर्मचाऱ्यांचे मोबाईल कॉल रेकॉर्ड तपासण्यात आले. त्यामध्ये या चौघांनी प्रजापतीशी सुमारे १५० वेळा दूरध्वनीवरून संवाद साधल्याचे निष्पन्न झाले. या संभाषणांचे स्वरूप काय होते, त्यामागे कोणते हितसंबंध होते आणि अवैध दारू व्यवसायाला संरक्षण देण्यात आले होते का, याचा तपास सीआयडीकडून केला जात आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला असून, आतापर्यंत आठ आरोपींना अटक केली आहे. विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूंसाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींविरोधात कारवाई करण्याबरोबरच आरोपी आणि पोलिस यांच्यातील संभाव्य संगनमताचा तपासही सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT