पुणे: मित्रासोबत मिळून आईने आपल्या पंधरा वर्षीय मुलीला अश्लील व्हिडीओ दाखविले. त्यानंतर दोघांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी, मुंढवा पोलिसांनी आरोपी आई आणि तिच्या मित्राला बेड्या ठोकल्या आहेत. याबाबत मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार मार्च 2025 ते डिसेंबर 2025 दरम्यानच्या कालावधीत घडला आहे. पीडित मुलीने ही माहिती आपल्या वडिलांना दिली. त्यानंतर ही घटना समोर आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला आयटी कंपनीत नोकरी करते. मार्च 2025 मध्ये मुलीच्या आईचा मित्र त्यांच्या घरी आला होता. त्याने मुलीला अल्कोहोल पाजले. त्याने मुलीसोबत अश्लील कृत्य केले.
मुलीने त्याला जाब विचारण्याचा प्रयत्न केला; परंतु तरी देखील तो तिच्यासोबत लगट करीत राहिला. मुलीने त्याच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली. एके दिवशी शाळेत समुपदेशकाला तिने आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी तिच्या आईला शाळेत बोलावून घेतले. तिची आई म्हणाली, ’मला माहिती आहे तिच्यासोबत काय घडले आहे,’ ते असे सांगून तिला घरी घेऊन गेली. महिलेचा मित्र घरी आल्यानंतर ते दोघे तिच्यासमोरच पॉर्न व्हिडिओ लावत होते. दोघांनी मुलीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. नोव्हेंबर 2025 मध्ये मुलगी तिच्या आईसोबत आईच्या मित्राच्या घरी गेली होती.
तिथे देखील दोघांनी तिच्यासोबत अश्लील वर्तन केले. मुलीने त्यांना विरोध केला असता, तिला अश्लील भाषेत शिवीगाळ केली. दरम्यान, मुलीने हा प्रकार आपल्या वडिलांना सांगितला. त्यांनी थेट मुंढवा पोलिस ठाणे गाठून पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य पाहता तत्काळ गुन्हा दाखल करून मुलीची आई आणि तिच्या मित्राला बेड्या ठोकल्या. आरोपी महिलेचे दोन विवाह झाले आहेत, तर काही वर्षे ती इतर दोघांसोबत लिव्ह - इनमध्ये देखील राहत होती. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक कल्पना सुरवसे करीत आहेत.
पीडित मुलीने तक्रार देताच पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून आरोपी महिला आणि तिच्या मित्राला अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.नीलेश जगदाळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुंढवा पोलिस ठाणे