

पुणे/ बिबवेवाडी: भरधाव पाण्याच्या टँकरने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार हॉटेल व्यावसायिकाचा मृत्यू झाला. अनिल सीताराम आल्हाट (वय 47, रा. भिमाले कॉम्प्लेक्स मार्केट यार्ड) असे मृत्युमुखी पडलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. याप्रकरणी, मार्केट यार्ड पोलिसांनी टँकरचालक नीलेश लक्ष्मण पोटे (वय 36, रा. पवन नगर, बिबवेवाडी) याला अटक केली आहे.
तर, टँकरमालक बगतावरमल राठी (वय 57, रा. सुखसागरनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास बिबवेवाडी-कोंढवा रोडवर कल्याण भेळ समोरील रस्त्यावर मार्केट यार्ड परिसरात घडली आहे. याबाबत अनिल यांचा भाचा महादेव गोरख कांबळे (वय 37) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, व्यावसायिक अनिल आल्हाट हे सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास कोंढवा-बिबवेवाडी रोडने चंद्रलोक चौकाकडे दुचाकीने जात होते. त्या वेळी कल्याण भेळ समोरील रस्त्यावर टँकरचालक नीलेश पोटेने आल्हाट यांच्या दुचाकीला वेगात धडक दिली. त्यामध्ये अल्हाट गंभीर जखमी झाले.
त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, त्यांचा मृत्यू झाला. टँकर मालक राठी याला टँकरच्या फिटनेस प्रमाणपत्राची वैधता संपल्याचे माहीत होते. तरी देखील त्याने टँकर पोटेला चालविण्यासाठी दिला. त्यामुळे राठीविरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टँकरमुळेही अपघाताचे प्रमाण वाढले
गेल्या काही दिवसांपासून शहरात अवजड वाहनांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच आता पाण्याच्या टँकरमुळे होणाऱ्या अपघाताचे देखील प्रमाण वाढीस लागल्याचे दिसून येत आहे. एनआयबीएम-कोंढवा परिसरात एका मद्यधुंद टँकरचालकाने दिलेल्या धडकेत 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता. चालक व्यसनी असल्याचे माहिती असूनही त्याच्या हाती वाहन सोपविणाऱ्या टँकर मालकालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. तर, वानवडीत एका आयटी अभियंता तरुणीचा टँकरच्या धडकेत मृत्यू झाला होता. याबाबत नुकतीच वाहतूक विभागाने एक बैठक देखील घेतली होती.