Gas Pipeline Pudhari
पुणे

Pune PNG Connection: पीएनजीची पाइपलाइन असूनही एलपीजी वापरताय? पुण्यातील ४ लाख ग्राहकांना १ ऑक्टोबरची मुदत

पीएनजी कनेक्शन न घेतल्यास एलपीजी कनेक्शन बंद होणार; एमएनजीएलकडून ग्राहकांना नोंदणीचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

पुणे: सोसायटीत फ्लॅटपर्यंत पाइप्ड नॅचरल गॅस (पीएनजी)ची पाइपलाइन पोहचली आहे. तरीदेखील नागरिक एलपीजी सिलिंडर वापरत आहेत. अशा पुण्यातील चार लाखांवर ग्राहकांना आता पीएनजी कनेक्शन घ्यावेच लागणार आहे. कारण, पीएनजीची सुविधा उपलब्ध असूनही कनेक्शन न घेणाऱ्यांचे एलपीजी कनेक्शन बंद करण्याची अधिसूचनाच काढण्यात आलेली आहे. त्यामुळे संबंधित ग्राहकांना १ ऑक्टोबरपर्यंत किमान पीएनजीसाठी नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड अर्थात एमएनजीएलच्या वतीने आयोजित पत्रकार संवाद बैठकीत एमएनजीएलचे व्यवस्थापकीय संचालक गिरिजा शंकर, वाणिज्यिक संचालक शंकर करजगी यांनी संबंधित माहिती दिली. या वेळी संचालक बागेश्री मंठाळकर यांच्यासह अन्य उपस्थित होते. गिरिजा शंकर आणि शंकर करजगी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड, तळेगाव आणि हिंजवडी परिसरात पीएनजीचा विस्तार मोठ्या प्रमाणावर झाला आहे. सध्या पुण्यात नऊ लाख घरांपर्यंत पीएनजीची पाइपलाइन पोहोचली आहे. त्यांपैकी पाच लाख ग्राहक प्रत्यक्षात पीएनजीचा वापर करत आहेत.

साधारण ६ हजार ५०० सोसायट्यांमध्ये एमएनजीएलचे कनेक्शन पोहोचले आहे. परंतु यातील जवळपास चार लाख ग्राहक पाइपलाइन उपलब्ध असूनही एलपीजी सिलिंडरचा वापर करत आहेत. ज्या सोसायटी किंवा परिसरात पीएनजीची पाइपलाइन आहे, तेथील रहिवाशांनी पीएनजी कनेक्शन घेणे अपेक्षित आहे. पाइपलाइन उपलब्ध असूनही पीएनजी कनेक्शन न घेता एलपीजीचा वापर सुरू ठेवणाऱ्या ग्राहकांचे एलपीजी कनेक्शन बंद करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यासाठी ग्राहकांना १ ऑक्टोबरची मुदत देण्यात आली आहे. या तारखेपर्यंत संबंधित ग्राहकांनी किमान नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी केल्यानंतर कनेक्शनची पुढील प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.

३७१ सोसायट्या एलपीजीमुक्त

पीएनजीचा वापर वाढवून सोसायट्या एलपीजी गॅसमुक्त करण्यावर एमएनजीएलने भर दिला आहे. गेल्या पाच महिन्यांत ३७१ सोसायट्या एलपीजीमुक्त करण्यात आल्या आहेत. आता आणखी ८०० सोसायट्या एलपीजीमुक्त करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. पीएनजीची पाइपलाइन उपलब्ध असलेल्या सोसायट्यांनी कनेक्शन घेण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करजगी यांनी केले आहे.

ग्राहकांच्या अडचणी सोडवण्यासाठी १२ मदत केंद्रे

ग्राहकांच्या अडचणी सोडवण्यासाठी शहरात १२ कस्टमर केअर सेंटर सुरू करण्याचे नियोजन आहे. सध्या कोंढवा, हडपसर आणि हिंजवडी येथे केंद्रे सुरू झाली आहेत. या ठिकाणी ग्राहकांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ग्राहकांना सेवा आणि तक्रारींसाठी 'एमएनजीएल'चे ॲपही उपलब्ध करून देण्यात आले आहे. संबंधित ॲपचा ग्राहकांनी वापर करावा, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT