प्रसाद जगताप
पुणे: बसमधून पडून एका तरुणीचा झालेला दुर्दैवी मृत्यू पुणेकरांच्या काळजाचा ठोका चुकवून गेला. मात्र, या भीषण घटनेनंतरही पीएमपीच्या कारभारात कोणतीही सुधारणा झाली नाही. दै. 'पुढारी'च्या वतीने बुधवारी (दि. २६) शहरातील महत्त्वाचे बसथांबे आणि धावणाऱ्या बसगाड्यांची 'ऑन द स्पॉट' पाहणी केली असता, प्रवाशांचा जीवघेणा प्रवास अजूनही सुरूच असल्याचे चित्र समोर आले.
पिक अवरला बसमध्ये गर्दीच गर्दी
सकाळच्या आणि सायंकाळच्या पिक अवरमध्ये डेक्कन, स्वारगेट, कात्रजसारख्या प्रमुख बसथांब्यांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. बसथांब्यावर येताच प्रवासी आत शिरण्यासाठी धडपड करीत होते. पीएमपीच्या एका बसची अधिकृत क्षमता ३५ बसलेले प्रवासी आणि १५ उभे प्रवासी, अशा एकूण ५० प्रवाशांची आहे. परंतु, प्रत्यक्षात एकावेळी त्यापेक्षा अधिक प्रवासी कोंबून वाहतूक केली जात आहे. बसमध्ये जागा नसल्याने तरुण, नोकरदार आणि महिलांना अक्षरशः पायरीवर अन् दरवाजाला लटकून प्रवास करावा लागत आहे.
वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत गाड्या तोकड्या
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्या तुलनेत पीएमपीच्या ताफ्यातील बसगाड्यांची संख्या अत्यंत तोकडी पडत आहे. ठरावीक मार्गांवर तासन् तास बस मिळत नाहीत आणि आलीच, तर ती तुडुंब भरलेली असते. त्यामुळे पीएमपी आणि पुणे शहर प्रशासनाने फक्त कागदी घोडे न नाचवता शहराच्या लोकसंख्येचा शास्त्रीय अभ्यास करून तातडीने नवीन गाड्यांची व्यवस्था करावी, अशी जोरदार मागणी पुणेकरांकडून केली जात आहे.
दररोज वेळेवर बस मिळत नाही आणि जी येते, त्यात पाय ठेवायलाही जागा नसते. अशी स्थिती खासकरून पिक अवरला सातत्याने असते. या वेळी नोकरीवर वेळेत पोहचण्यासाठी जीव मुठीत धरून दरवाजाला लटकण्याशिवाय आमच्याकडे पर्याय उरत नाही. अपघात घडल्यावर दोन दिवस चर्चा होते. पण, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी जादा गाड्या सोडण्याची तसदी घेतली जात नाही. त्यामुळे पीएमपी प्रशासनाने मार्गांचा अभ्यास करून पूरक बस उपलब्ध करून द्याव्यात.गणेश गोरड, नियमित पीएमपी प्रवासी, सिंहगड कॉलेज, चरवडवस्ती रहिवासी
सिंहगड रस्त्यावर घडलेली घटना आम्ही अत्यंत गांभीर्याने घेतली आहे. ताफ्यातील सर्व बसचे दरवाजे पूर्णपणे बंद केल्याशिवाय एकही गाडी पुढे धावणार नाही, असे आदेश सर्व चालक आणि वाहकांना दिले आहेत. सर्व ठेकेदार आणि डेपो मॅनेजर्सना या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले आहे. प्रवाशांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.महेश आव्हाड, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल