पुणे: चालकाचे नियंत्रण सुटल्याने पीएमपीएमएल बस थेट रस्त्याकडेला असलेल्या दुकानात घुसल्याची घटना आप्पा बळवंत चौकात मंगळवारी (दि. 21) दुपारी चार वाजताच्या सुमारास ही घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, दुकानासमोरील दोन दुचाकी आणि दुकानातील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.
याप्रकरणी, विश्रामबाग पोलिसांनी बसचालक बाळू गहिनीनाथ चव्हाण (वय 32) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत दुकानचालक विनोद पतंगे यांनी फिर्याद दिली आहे. पतंगे यांचे लग्नपत्रिका छापण्याचे दुकान असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव बुद्रुक ते पुणे स्टेशन या मार्गावर धावणारी पीएमपीएमएलची बस मंगळवारी सायंकाळी चारच्या सुमारास अप्पा बळवंत चौकातून जात होती. त्यावेळी परिसरात नेहमीप्रमाणे मोठी वाहतूक आणि नागरिकांची गर्दी होती.
अचानक चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस भरधाव पुढे जाऊन रस्त्यालगतच्या दुकानावर आदळली. या जोरदार धडकेत दुकानाच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले. दुकानाच्या काचा फुटल्या असून, आतील फर्निचर, साहित्य तसेच विक्रीसाठी ठेवलेल्या मालाचे मोठे नुकसान झाले आहे. धडकेचा आवाज मोठा असल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताच्या वेळी दुकानासमोर किंवा बसच्या समोर कोणीही नागरिक नसल्याने मोठी दुर्घटना टळली. घटनेची माहिती मिळताच पोलिस तसेच पीएमपीएमएल प्रशासनातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.