PMPML Pudhari
पुणे

Pune PMPML Bus Accident: पुण्यात पीएमपी बसचा कहर; एकाच दिवशी दोन महिलांचा मृत्यू, दोन अपघातांनी खळबळ

बोपोडी आणि चंदननगरमध्ये भरधाव बसची धडक; एका अपघातात पादचारी महिला, तर दुसऱ्यात दुचाकीवरील महिलेचा मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पीएमपी बसच्या धडकेत वेगवेगळ्या अपघातांत एकाच दिवशी दोन महिलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावरील बोपोडी चौक व चंदननगर परिसरात अपघाताच्या या घटना घडल्या. याप्रकरणी खडकी आणि विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोडी पुलाजवळ पीएमपी बसच्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि. ७ जुलै) दुपारी ४ वाजता घडली. निर्मला नरेश पिल्ले (वय ५७) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत त्यांची मुलगी प्रीती आकाश मूर्ती (वय ३२, रा. गाडीअड्डा, खडकी बाजार) यांनी खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पीएमपी बसचालक सुमंता बाबासाहेब गंभीरे (वय २२, रा. शेवाळवाडी, मूळ रा. बीड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निर्मला पिल्ले शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास बोपोडी पूल परिसरातून निघाल्या हाेत्या. त्या वेळी भरधाव पीएमपी बसने त्यांना धडक दिली. अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली. पोलिस उपनिरीक्षक गाडेकर तपास करीत आहेत. दुसरा अपघात पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील चंदननगर अंबर रेस्टॉरंट आणि बारसमोरील रोडवर घडला आहे.

भरधाव पीएमपीने दुचाकीला धडक दिल्याने सहप्रवासी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. अपघातात महिलेचा दुचाकीस्वार मुलगा जखमी झाला. याप्रकरणी पीएमपी बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनीता गणपत काटे (वय ५४) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. अपघातात सुनीता यांचा मुलगा करण (वय २०) हा जखमी झाला. याबाबत काटे यांचा भाऊ सुनील मारुती नागवडे (वय ४७, रा. श्रीकृष्णनगर, पिंपळे गुरव) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दुचाकीस्वार करण काटे आणि त्याची आई सुनीता हे पुणे-अहिल्यानगर रस्त्याने वाघोलीकडे शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास निघाले होते. त्या वेळी विमाननगर परिसरात भरधाव पीएमपीने दुचाकीला धडक दिली. अपघातानंतर सुनीता काटे रस्त्यावर पडल्या. पीएमपी बसच्या चाकाखाली सापडून त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर पीएमपी बसचालक पसार झाला. सहायक पोलिस निरीक्षक अशोक शिरसाट तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT