PMFME Pudhari
पुणे

Pune PMFME Scheme Projects: पीएमएफएमई योजनेतून पुणे जिल्ह्यात २५० प्रकल्प कार्यान्वित; ४६ कोटींची गुंतवणूक

सुमारे एक हजारांना रोजगार; अन्न प्रक्रिया उद्योगात हवेली तालुका आघाडीवर

पुढारी वृत्तसेवा

पुणे: केंद्र सरकारच्या पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत (पीएमएफएमई) यंदाच्या 2025-26 वर्षासाठी पुणे जिल्ह्याला 480 प्रकल्पांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यामध्ये दाखल परिपूर्ण 250 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आल्यानंतर ते प्रत्यक्षात सुरूही झालेले आहेत. जिल्ह्यात या प्रकल्पांमधून सुमारे 46 कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक झालेली आहे. तसेच सुमारे एक हजार लोकांना नव्याने रोजगार मिळालेला आहे. सद्यस्थितीत विविध बँकांच्या स्तरावर 332 प्रस्ताव हे कर्ज मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.

दरम्यान, या आर्थिक वर्षामध्ये विविध बँकांमार्फत एकूण 38 कोटी 39 लाख रुपयांइतके कर्ज संबंधित प्रकल्पांसाठी वितरित झाले आहे. तर पीएमएफएमई योजनेतून आत्तापर्यंत 13 कोटी 49 लाख रुपयांइतके अनुदान संबंधित प्रकल्पाच्या लाभार्थी शेतकऱ्यांना वितरित केल्याचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले.

केंद्र सरकारकडून अर्थसहाय्यीत पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (पीएमएफएमई) सन 2020-21 पासून राज्यात राबविण्यात येत आहे. या योजनेतून कार्यरत प्रकल्पांचे विस्तारीकरण व नव्याने उभारणी होणाऱ्या पात्र प्रकल्पांना प्रकल्प किंमतीच्या 35 टक्के व कमाल रक्कम रुपये 10 लाखांइतके अनुदान वैयक्तिक लाभार्थ्यांना वितरीत करण्यात येते. यामध्ये लाभार्थी स्व-हिस्सा किमान 10 टक्के आहे. तसेच शेतकरी उत्पादक संस्था/ स्वयंसहाय्यता गट/ सहकारी उत्पादक यांना सामाईक पायाभूत सुविधा, शेतमालाचे उत्पादनापासून ते ग््रााहकांकडे जोडणारा दुवा (फॉरवर्ड- बॅकवर्ड लिंकेज), भांडवली गुंतवणुकीकरता खर्चाच्या 35 टक्क्यांइतके अनुदान दिले जात आहे.

तसेच, मार्केटींग व बॅण्डिंग या घटकांतर्गत एकूण खर्चाच्या 50 टक्के अनुदान देय आहे. स्वयंसहाय्यता गटांना खेळते भांडवल, सदस्यांना कर्ज किंवा गुंतवणुकीकरीता (सीड कॅपिटल) प्रति बचत गटास रक्कम रुपये चार लाखांएवढा लाभ दिला जात आहे.

या योजनेअंतर्गत एका गटातील कमाल दहा सदस्यांना प्रत्येकी 40 हजार रुपयांइतके बीज भांडवल म्हणून देण्यात येतात. या योजनेंतर्गत अनुसूचित जाती, जमाती, महिला यांना प्राधान्य देण्यात येत आहे. लाभार्थ्यांना किमान शिक्षणाची अट रद्द करण्यात आलेली आहे. जिल्हास्तरीय प्रशिक्षण संस्थेमार्फत इच्छुक लाभार्थीना, कर्ज मंजूर झालेले लाभार्थी यांना प्रशिक्षण देण्यात येते.

प्रकल्पात हवेली आघाडीवर; दुग्ध उद्योगाचे सर्वाधिक 39 प्रकल्प

जिल्ह्यात अन्न प्रक्रियेचे सर्वाधिक 67 प्रकल्प हे हवेली तालुक्यात आहे. शहराला लागून महत्वाचीआणि हक्काची बाजारपेठ असल्याने या तालुक्यात प्रकल्पांची संख्या अधिक असल्याचे दिसून येत आहे. तालुकानिहाय प्रकल्प संख्येमध्ये हवेली 67 सह दौंड 43, बारामती 28, जुन्नर 27, खेड 21, इंदापूर 16, शिरुर 14, आंबेगांव 11, मावळ 7, पुरंदर 7, भोर 5,मुळशी 4. दुग्ध प्रक्रिया उद्योग 39, मसाले पापड व लोणचे उद्योग 33, बेकरी उद्योग 23, गूळ उद्योग 18, पशुखाद्य व कोंबडी खाद्य उद्योग 26, फळे व भाज्या प्रक्रिया उद्योग 33, दाल मिल व राइस मिल आधारित उद्योग 24, तेलबियांवर आधारित उद्योग 10, नमकीन उद्योग (रेडी टू इट) 21, गहू आधारित उद्योग 10,मिलेटवर आधारित उद्योग 9,इतर उद्योग 4.

सहभागासाठी इच्छुकांनी करावेत संकेतस्थळावर अर्ज

पुणे जिल्ह्यात पीएमएफएमई योजनेअंतर्गत लाभ घेण्यास इच्छुक वैयक्तिक लाभार्थ्यांनी संकेतस्थळावर अर्ज सादर करावेत. तसेच, शेतकरी उत्पादक संस्था, स्वयंसहाय्यता गट, सहकारी उत्पादकांनी ऑफलाईन अर्ज कार्यालयात सादर करावेत.

पुणे जिल्ह्यात पीएमएफएमई योजनेतून प्रामुख्याने दूध प्रक्रिया, मसाले व लोणची पापड, फळे व भाजीपाला प्रक्रिया, पशुखाद्य व कोंबडी खाद्य, बेकरी, दाल व राईस मिल, नमकीन उद्योग सुरु करण्यास शेतकऱ्यांकडून प्राधान्य दिले जात आहे. स्थानिक कच्च्‌‍या मालाच्या उपलब्धतेनुसार किफायतशीर व दीर्घकाळ सुरु राहील, असाच व्यवसाय प्राधान्याने निवडला जात आहे. केंद्र सरकारच्या या महत्वांकाक्षी योजनेमुळे ग््राामीण भागात रोजगार निर्मितीसही पाठबळ मिळाले आहे.
संजय काचोळे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पुणे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT