टँकरने पाणी देताना जादा शुल्क आकारू नका ; टँकर मालकांना पुणे पालिकेची तंबी  file photo
पुणे

टँकरने पाणी देताना जादा शुल्क आकारू नका ; टँकर मालकांना पुणे पालिकेची तंबी

Water crisis : शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याचे आयुक्तांनी दिले आदेश

पुढारी वृत्तसेवा

PMC warning to water tankers

पुणे : सध्या उन्हाळा असल्यामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. ज्या भागात जलवाहिनीद्वारे पाणी पुरवणे शक्य नाही अशा परिसरात टँकरने पाणी पुरवठा केला जातो. मात्र, हे टँकरचालक नागरिकांकडून पाण्यासाठी जादा पैसे आकारून त्यांची लूट करत असल्याचं समोर आलं आहे. तसेच त्यांना शुद्ध पाणी देखील पुरवले जात नसल्याने याची दखल महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी घेतली आहे. त्यांनी टँकरचालकांना तंबी देत पाणी देताना जादा शुल्क आकारू नका अशी तंबी देत जादा पैशाची मागणी करणाऱ्यांची महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या मुख्य अभियंत्यांकडे तक्रार करा, असे आवाहन केले.

शहरातील पाण्याची वाढलेली मागणी व धरणातील उपलब्ध पाणीसाठा बघता शहरात टँकरच्या पाण्याची मागणी वाढली आहे. या पाण्याची गरज भागविण्यासाठी शहरातील काही सोसायट्यांकडून मोठ्या प्रमाणात टँकर मागवले जातात. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. भोसले यांनी बुधवारी महापालिकेत टँकर चालक मालक असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांना विविध सूचना केल्या.

या बैठकीत नागरिकांना वेठीस धरुन टँकरसाठी वाढीव दर आकारु नये, अशी तंबी देखील आयुक्त भोसले यांनी दिली. या बैठकीत स्वत:च्या जलस्त्रोतातून पाणीपुरवठा करणारे बोअरवेल व विहीरमालक, पाणीपुरवठा विभागप्रमुख नंदकिशोर जगताप, अधीक्षक अभियंता प्रसन्नराघव जोशी व अन्य अधिकारी उपस्थित होते.

पुण्यातील उपनगरे, समाविष्ट गावांबरोबरच मध्यवर्ती भागातूनही टँकर मागवले जात आहेत. काही ठिकाणी टँकर माफिया मनमानी शुल्क नागरिकांकडून अकरत आहे. पालिकेच्या टँकर मोफत असतांना देखील त्यांच्याकडे पैशांची मागणी केली जाते. या बाबतच्या अनेक तक्रारी महापालिकडे आल्या. या बैठकीत आयुक्त डॉ. भोसले यांनी टँकरचालकांशी चर्चा केली व त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.

पालिकेच्या टँकर पॉइंट्सवरून टँकर भरुन घेऊन नागरिकांना पोहचविण्यासाठी निश्चित किती खर्च येतो, याची देखील माहिती भोसले यांनी घेतली. टँकर भरुन घेऊन नागरिकांना पोहचविण्याासाठी किती खर्च येतो ? टँकर भरण्याचे ठिकाण आणि ज्या ठिकाणावरून टँकरची मागणी झालेली आहे. त्यामधील अंतर यावर टँकरचे दर कसे ठरतात ? याची देखील माहिती घेत नागरिकांची पाण्याची गरज लक्षात घेत विनाकारण दर आकारु नका, अशा सूचना आयुक्त डॉ. भोसले यांनी टँकरचलकांना बैठकीत दिल्या.

जादा पैशांची मागणी केल्याच्या पालिकेकडे अनेक तक्रारी

पुण्यात जलवाहिन्यांचे जाळे सर्व भागात नाही. जेथे जलवाहिन्या नाहीत तेथे टँकरने पाणी पुरवठा केला जातो. हे पाणी मोफत देणे अपेक्षित असतांना टँकरचालक नागरिकांकडे पैसे मागतात. याबाबत अनेक तक्रारी देखील नागरिकांनी पालिकेकडे केल्या आहेत. त्यामुळे टँकरचालक नागरिकांकडून पैसे मागत असतील तर त्यांची तक्रार पाणीपुरवठा विभागाच्या मुख्य अभियंत्यांकडे करावी, अशा सूचना आयुक्त भोसले यांनी दिल्या.

प्रामुख्याने आंबेगाव बुद्रुक, नऱ्हे, खराडी या भागातून टँकरने पाणी पुरवठा केला जात असून या ठिकाणी टँकरसाठी पैसे मागितले जात असल्याच्या अनेक तक्रारी पालिकेला आल्या आहेत. या तक्रारींची दखल घेत संबधितांवर कडक कारवाई करण्याचा इशारा महापालिका आयुक्त डॉ. भोसले यांनी दिला. शहरातील टँकरची मागणी व त्यासाठी घेतले जाणारे शुल्क याचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना देखील आयुक्त भोसले यांनी प्रशासनाला बुधवारी दिल्या.

स्वच्छ पाण्याचा पुरवठा करा

शहरात टँकरची मागणी वाढली आहे. ही गरज खासगी टँकरद्वारे पूर्ण केली जाते. महापालिकेच्या टँकर भरणा केंद्राबरोबरच बोअरवेल व विहिरीमधून पाणी भरुन ते टँकरद्वारे पोहचवले जाते. मात्र, हे पाणी शुद्ध असेलच याची शास्वती नसते. त्यामुळे हे पाणी शुद्ध आहे की नाही याची खात्री संबधित टँकरचालकांनी व मालकांनी करुन त्यानंतरच हे पाणी वितरित करावे तसेच त्यात आवश्यक प्रमाणात क्लोरिन देखील टाकावे अशा सूचना आयुक्त डॉ. भोसले यांनी दिल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT