

माळीनगर : जीवनातील महत्त्वाचा मानला जाणारा लग्न सोहळा पार पडला आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच नववधुला ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने प्राण सोडावा लागला. ही हृदय पिळवून टाकणारी घटना बाभूळगाव (ता. माळशिरस ) येथे पराडे-गळगुंडे या परिवारांत घडली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
समीर हरिदास पराडे यांचा १३ मे रोजी घोटी (ता .माढा ) येतील जानकी बाळासाहेब गळगुंडे यांच्याशी मोठ्या दिमाखात विवाह सोहळा निरा नरसिंहपूर येथील मंगल कार्यालयात संपन्न झाला होता. लग्नानंतर नववधू सासरी आली. दुसऱ्या दिवशी सकाळी अचानक छातीत कळा येऊ लागल्याने तिला तात्काळ अकलूज येथील अश्विनी हॉस्पिटल येथे घेऊन जात असतानाच वाटेत नववधूवर काळाने झडप घातली. या अचानक झालेल्या मृत्युने सासर आणि माहेरच्या दोन्ही कुटुंबाने टाहो फोडला. मृत्यू झालेल्या जानकी हिच्यावर बाभुळगाव येथे शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले.