

वर्धा : विहिरीतील मलबा काढत असताना अचानक विहीर खचल्याने एकाचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले. ही घटना आर्वी तालुक्याच्या नटाळा शिवारात मंगळवारी (दि.१३) घडली. आदित्य ईश्वर मसराम (वय २४) असे मृत तरूणाचे नाव आहे.
आर्वी तालुक्यातील नटाळा शिवारात शेतामध्ये असलेल्या विहिरीतील मलबा काढण्याचे काम सुरू होते. यावेळी अचानक विहिरीचा काही भाग खचला. त्यामध्ये आदित्यचा याचा मृत्यू झाला. व सोमेश्वर मलगाम (वय ४४), मुकेश उईके (वय ३८) हे दोघे जखमी झाले. दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जवळपास सहा तासांच्या प्रयत्नांनी पोकलँडच्या मदतीने आदित्य मसरामचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. घटनास्थळी खरांगणा (मोरांगणा) पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रकांत पाटील, सहायक पोलिस निरीक्षक वसंत पिसे, विठ्ठल केंद्रे, शंकर केंद्रे यांनी भेट दिली.