पुणे : महापालिकेने भाडेतत्त्वावर दिलेल्या जमिनीचे नातेवाइकांमधील व्यवहारातून परस्पर खरेदीखत करून एका बँकेकडून तब्बल अडीच कोटी रुपयांचे कर्ज काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
या प्रकरणात महापालिकेची फसवणूक झाल्याचे प्राथमिक निष्कर्ष निघत असून, संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची शिफारस विधी विभागाने मालमत्ता व्यवस्थापन विभागाला केली आहे. त्यामुळे महापालिकेकडून भाडेतत्त्वावर देण्यात आलेल्या इतर जमिनींची सद्य:स्थिती काय? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
लहुजी समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष अनिल हातागळे यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत या प्रकाराचा पर्दाफाश केला. महात्मा फुले-घोरपडी पेठ येथील अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेली चार गुंठे जमीन महापालिकेने पूरग््रास्तांच्या पुनर्वसनासाठी 90 वर्षांकरिता भाडेतत्त्वावर दिली होती.
मात्र, संबंधित महिलेच्या नातेवाइकांनी बनावट दस्तऐवज तयार करून जमिनीचे हक्क आईच्या नावावर घेतले आणि नंतर त्या जागेवर तब्बल अडीच कोटी रुपयांचे कर्ज काढले. या अनधिकृत हस्तांतराबाबत मूळ भाडेकरूने थेट महापालिका व पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी कागदपत्रांची तपासणी करून महापालिका आयुक्तांना अहवाल पाठविला.
अहवालात फसवणुकीचे संकेत स्पष्ट असल्याचे नमूद करून पुढील कारवाईची जबाबदारी महापालिकेवर सोपविण्यात आली. मालमत्ता व्यवस्थापन विभागाने विधी शाखेकडून अभिप्राय मागविल्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची शिफारस केली. त्यानुसार पुढील पाऊल उचलले जाणार असल्याची माहिती उपायुक्त प्रशांत ठोंबरे यांनी दिली.