Illegal Construction Action Pudhari
पुणे

Pune Illegal Construction Action: लोहगाव-खराडीतील अनधिकृत बांधकामांवर मनपाचा ‘सर्जिकल स्ट्राईक’

पहाटेच्या कारवाईत 52,250 चौरस फूट बांधकाम जमीनदोस्त; 7 आरएमसी प्लांटवर बुलडोझर

पुढारी वृत्तसेवा

पुणे: महानगरपालिकेने अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांविरुद्ध पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. बुधवारी (दि. 15) पहाटेच्या सुमारास लोहगाव व खराडी परिसरात ‌‘सर्जिकल स्ट्राईक‌’ करत महापालिकेने तब्बल 52,250 चौरस फूट अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केले. यामध्ये लोहगाव येथील 7 आरएमसी प्लांट आणि खराडी ईऑन आयटी पार्क परिसरातील बेकायदा शेडचा समावेश आहे.

महापालिका आयुक्त यांच्या आदेशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर, तसेच उपआयुक्त सोमनाथ बनकर यांच्या नियंत्रणाखाली ही मोहीम राबविण्यात आली. पहाटे 2 वाजता महापालिकेचे पथक लोहगाव येथील खांदवेनगर आणि महालक्ष्मी लॉन्स परिसरात दाखल झाले. या ठिकाणी असलेल्या 7 आरएमसी प्लांटवर बुलडोझर चालवण्यात आला. या प्लांटमुळे मोठ्या प्रमाणावर धूळ आणि प्रदूषण होत असल्याच्या तक्रारीही नागरिक करीत होते.

कारवाईवेळी प्रीतम खांदवे यांनी अधिकाऱ्यांशी हुज्जत घालत गचांडी धरल्याची चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र, या चर्चेत कोणतेही तथ्य नसल्याचे बनकर यांनी स्पष्ट केले. परंतु, खांदवे यांनी कारवाईदरम्यान हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी वादावादी झाली. अतिक्रमण निरीक्षकांच्या अंगावर धावून गेले. त्यानंतर एमएसएफच्या पोलिसांनी पकडून पिंजऱ्यात टाकून प्रीतम खांदवे यांना पोलिस ठाण्यात नेले, असे बनकर यांनी सांगितले.

फौजफाटा, आधुनिक यंत्रसामग््राी

या मोहिमेसाठी महापालिकेने मोठा फौजफाटा तैनात केला होता. 16 जेसीबी, 5 गॅसकटर आणि 2 बेकरच्या साहाय्याने अनधिकृत बांधकामे पाडली. या मोहिमेत 75 एम.एस.एफ. जवान, 30 सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक आणि 85 बिगारी सेवकांनी सहभाग घेतला. खराडी ईऑन आयटी पार्क परिसरातील मोकळ्या जागांवर उभारलेले कच्चे आणि पक्के शेड देखील या वेळी पूर्णपणे हटविण्यात आले.

नागरिकांकडून समाधान

रस्ते अडवून आणि नियमांचे उल्लंघन करून उभारण्यात आलेल्या या बांधकामांमुळे स्थानिक रहिवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. महापालिकेने केलेल्या या धडाकेबाज कारवाईनंतर परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

कारवाईचा तपशील

  • एकूण क्षेत्रफळ : 52,250 चौरस फूट

  • प्रमुख लक्ष्य : 7 आरएमसी प्लांट (लोहगाव)

  • बळ : 16 जेसीबी, 75 जवान, 85 कर्मचारी

  • वेळ : पहाटे 2:00 वाजता

  • परिसर : लोहगाव, खांदवे नगर, खराडी ईऑन आयटी पार्क

आरएमसी प्लांट तात्पुरत्या विश्रांतीवर

पुणे आरएमसी असोसिएशनने उद्योगातील अनुपालन व सुरक्षा मानके मजबूत करण्यासाठी सर्व आरएमसी प्रकल्पांमध्ये दि. 15 एप्रिल 2026 च्या मध्यरात्रीपासून काही दिवसांचा तात्पुरता व संरचित कार्यविराम जाहीर केला आहे. त्यानुसार या संरचित सुधारणा कालावधीत सर्व आरएमसी प्रकल्पांमधून रेडीमिक्स काँक्रीटचे उत्पादन आणि पुरवठा स्थगित राहील, असे पुणे आरएमसी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप पोपटराव वाल्हेकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच, आरएमसी व्यवसायासाठी स्वतंत्र धोरण आखत, यासाठी लागणाऱ्या परवानग्यांसाठी एक खिडकी योजना राबविण्याची मागणीही त्यांनी या वेळी केली आहे.

महापालिकेकडून कोणतीही नोटीस न देता कारवाई करण्यात आली. नोटिशीबद्दल विचारणा केली असता, काही अधिकारी माझ्याच अंगावर आले. अचानक ते समोर आल्यामुळे मी दचकलो, यात त्यांच्या अंगाला धक्का लागला असेल, पण कोणताही वाद झालेला नाही. त्यानंतर त्यांनी पिंजऱ्यात बसवले आणि दोन तास फिरवले. पोलिस ठाणे अवघ्या एक किलोमीटरवर होते. पण त्यांनी हा प्रकार का केला तर माहीत नाही. इतर कोणताही प्रकार घडलेला नाही. सगळे आरएम सी प्लांट बंद होते. फक्त एका प्लांटला न्यायालयाची स्थगिती आहे.
प्रीतम खांदवे, नागरिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT