नारायणगाव : जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथील काकड पट्ट्यामध्ये गुरुवारी (दि.२) सकाळी अकराच्या सुमारास मयूर नेताजी वाघ यांच्या घराजवळ बिबट्याने डरकाळी फोडली. त्यामुळे घरातील मुले घाबरून गेली. त्यांनी तातडीने घराचा दरवाजा लावून घेतला. बिबट्याने दोन ते तीन वेळा डरकाळी फोडून घरात येण्याचा प्रयत्न केला. हा थरार मुलांनी मोबाईलमध्ये चित्रित केला. दरम्यान, घराबाहेर बांधलेली मेंढी बिबट्याने ओढून नेण्याचा प्रयत्न केला. परंतु, खुंटी खोलवर असल्याने बिबट्याला मेंढी नेता आली नाही.
वाघ यांच्या घराजवळ बिबट्या आला त्यावेळी घरात त्यांची तीन मुले ऋषिकेश, ओम व विश्वजीत तसेच मुलांची बहीण छकुली व त्यांची आई साधना घरात होते. त्यांनी घरातून आवाज देऊन बिबट्याला पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला. घरातील सदस्यांनी बिबट्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला. परंतु, बिबट्याने दरवाजावर पंजा मारून घरात जाण्याचा प्रयत्न केला. घराला लोखंडी दरवाजा असल्याने बिबट्याला घरात जाता आले नाही.या घटनेची माहिती समजतात वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेली मेंढी वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी उसाच्या कडेला नेऊन टाकली. काही वेळात दोन बिबट्यांनी तेथे येत जखमी मेंढीला उसात नेले. दरम्यान, मयूर वाघ यांचे शेतात एकटेच घर असल्याने या घराजवळ तत्काळ झटका मशीन बसवण्याचे काम वन खात्याने सुरू केले आहे.
पिंपळवंडी येथील काकड पट्ट्यामध्ये सुमारे २५ बिबटे असल्याची शक्यता स्थानिक शेतकरी सुनील काकडे यांनी व्यक्त केली. बिबट्याच्या भीतीने आमची मुले शाळेत जाऊ शकत नाहीत. त्यामुळे वनखात्याने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, मयूर वाघ यांनी बिबट्यांना वन खात्याने पकडून घ्यावे अन्यथा शेतकऱ्यांना बंदुकीचा परवाना देऊन बिबट्यांना ठार मारण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली. आमदार शरद सोनवणे यांनी वन खात्याच्या कर्मचाऱ्यांना बिबट्याबाबत सर्तकतेच्या सूचना दिल्या आहेत. रात्रीच्या वेळी लहान मुलांनी घराच्या बाहेर पडू नये, असेही आवाहन केले आहे.