चांदवड (नाशिक) : तालुक्यातील मेसनखेडे बुद्रुक शिवारात मेढ्यांच्या कळपावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक मेंढी ठार झाली. मंगळवारी (दि. २३) मेंढपाळ कारभारी चिमाजी जाधव (रा. कोटबेल, ता. सटाणा) हे मेंढ्या चारत असताना दुपारी ४ वाजेच्या सुमारास बिबट्याने मेंढ्यांच्या कळपावर हल्ला केला.
या हल्ल्यात एक मेंढी ठार झाली. घटनेची चांदवड वनविभागाला माहिती देण्यात आली. मात्र वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी २४ तास उलटून देखील घटनास्थळी न गेल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दुसऱ्या दिवशी देखील एकही कर्मचारी पंचनामा करायला आला नाही. यामुळे शेतकरी व मेंढपाळांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. बुधवारी (दि.२४) रोजी दुपारी धनगर समाजाचे मच्छिंद्र बिडगर, मेसनखेडे खुर्दचे पोलिस पाटील अनिल ठोंबरे, पोलिस पाटील समाधान करे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मात्र, वनविभागाने याची दखल न घेतल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.