पुणे : पुढारी वृत्तसेवा : सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोरेगाव पार्क परिसरातील साधू वासवानी पूल नव्याने बांधण्याचे काम सुरू केले आहे. बुधवार (दि.10) पासून कोरेगाव पार्क भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला असून, या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. साधू वासवानी पूल जुना झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नव्याने बांधण्यात येणार आहे. त्यामुळे या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल केले आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा ,असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.
येरवड्यातील पर्णकुटी चौक ते ब्ल्यू डायमंड चौक ते मोबोज चौक हा मार्ग एकेरी करण्यात येणार आहे. मोबाज चौक ते महात्मा गांधी उद्यान चौक (बंडगार्डन रस्ता) एकेरी मार्ग करण्यात येणार आहे. अलंकार चौक ते आयबी चौक ते सर्कीट हाऊस चौक ते मोरओढा चौक मार्ग एकेरी करण्यात येणार आहे. मोरओढा चौक ते कौन्सिल हॉल चौक एकेरी मार्ग करण्यात येणार आहे. काहून रोड जंक्शन ते तारापूर रोड जंक्शन रस्ता पूर्वीप्रमाणेच एकेरी राहणार आहे. कौन्सिल हॉल चौक ते साधू वासवानी पुतळा मार्ग एकेरी करण्यात येणार आहे.
पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे : नगर रस्त्यावरून मोरओढा चौकाकडे जाणार्या वाहनांनी पर्णकुटी चौक, महात्मा गांधी चौक, ब्ल्यू डायमंड चौकातून उजवीकडे वळावे. तेथून मोबोज चैाक, मंगलदास चौकीकडून पुन्हा डावीकडे वळावे. रेसीडन्सी क्लब चौकातून सर्किट हाऊसमार्गे मोरओढा चौकाकडे जावे. मोरओढा चौकातून कोरेगाव पार्क चौकाकडे जाणार्या वाहनांनी कौन्सिल हॉल चौक, मंगलदास चौक, बंडगार्डन रस्ता, महात्मा गांधी उद्यान चौकातून उजवीकडे वळून कोरेगाव पार्ककडे जावे. पुणे स्टेशनहून कोरेगाव पार्ककडे जाणार्या वाहनांनी अलंकार चौक, कौन्सिल हॉल चौक, बंडगार्डन रस्ता उजवीकडे वळून कोरेगाव पार्ककडे जावे. पुणे स्टेशनकडून घोरपडी गावाकडे जाणार्या वाहनांनी अलंकार चौक, आयबी चौक, सर्किट हाऊस चौकमार्गे मोरओढा चौकात जावे. तेथून इच्छितस्थळी जावे.
हेही वाचा