पुणे: पुणे विभागीय पारपत्र कार्यालयाच्या वतीने वर्षभरात 4 लाख 70 हजार पासपोर्टचे वितरण करण्यात आले आहे. फेबुवारी महिन्यात 43 हजार 909 इतका टप्पा पार करण्यात यश आले आहे. शहरात बेकायदा पासपोर्टवर राहणाऱ्या विदेशी नागरिकांवर कारवाई सुरू झाली आहे.
पुणे विभागाचे प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी डॉ. विनोद गायकवाड आणि उप पासपोर्ट अधिकारी श्रिती पांडे यांनी सोमवारी बाणेर येथील पासपोर्ट भवनात आयोजित पत्रकार परिषदेत पासपोर्ट संबंधित माहिती दिली. मुंढवा येथील पासपोर्ट सेवा केंद्र (पीएसके) 30 मार्च 2026 पासून बाणेर-पाषाण लिंक रोडवर स्थलांतरित करण्यात आले आहे.
बेकायदेशीर पासपोर्ट वापरणाऱ्यांमध्ये बांगलादेशी नागरिकांचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून आले आहे. डॉ. गायकवाड यांनी सांगितले की, एआय वापरून काही नागरिक पासपोर्ट अर्जादरम्यान बनावट कागदपत्रे सादर करत आहेत.अशा व्यक्तींविरुद्ध एफआयआर दाखल झाले आहेत.
श्रिती पांडे यांनी सांगितले की, एकल पालक प्रकरणांमध्येही नियमांनुसार पासपोर्ट जारी केले जातात. पासपोर्ट कार्यालयाच्या अधिकृत वेबसाइटवर एकल पालकांशी संबंधित सर्व माहिती उपलब्ध आहे. घटस्फोटाच्या प्रकरणांचाही एकल पालक प्रकरणांमध्ये समावेश होतो. परराष्ट्र मंत्रालयाच्या नियमांनुसार पासपोर्ट जारी केले जातात.
18 हजार चौरस फूट जागेत स्थलांतर
मुंढवा येथील पासपोर्ट सेवा केंद्र सोमवारी (30 मार्च) बाणेर-पाषाण लिंक रोडवर स्थलांतरित झाले. नवीन कार्यालय 18 हजार चौरस फूट जागेत आहे. प्रतीक्षा कक्ष मोठा असून, त्यात स्वतंत्र प्रतीक्षा कक्ष आणि दोन मोठे हॉल आहेत. येथे दररोज 1800 पेक्षा जास्त पासपोर्ट अपॉइंटमेंट्स दिल्या जातील. लोकांना पासपोर्टसंबंधी अधिकृत माहिती मिळावी यासाठी ’ओपन हाऊस’चे आयोजनही केले जात आहे.