Papaya Pudhari
पुणे

Pune Papaya Price: पपई झाली महाग! उन्हाच्या तडाख्याने उत्पादन घटले; पुणे बाजारात दर विक्रमी पातळीवर

गुलटेकडी मार्केट यार्डात आवक निम्म्यावर; घाऊक दर २५ ते ४० रुपये किलो, किरकोळ बाजारात ग्राहकांना मोठा फटका

पुढारी वृत्तसेवा

पुणे: फ्रूट प्लेटमधील सर्वाधिक पसंतीच्या फळांपैकी एक फळ म्हणजे पपई. पावसाच्या सरींनी गारवा निर्माण होताच प्रत्येकाला पपई हवीहवीशी वाटते. मात्र, यंदाच्या तीव्र उन्हामुळे पपईच्या फुलांची मोठ्या प्रमाणात गळ होऊन उत्पादनात लक्षणीय घट झाली आहे.

परिणामी, गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात पपईची आवक निम्म्यावर आली असून, मागणीच्या तुलनेत पुरवठा अत्यल्प राहिल्याने पपईला विक्रमी दर मिळत आहेत. घाऊक बाजारात प्रतिकिलो २५ ते ४० रुपये भाव मिळत असताना, किरकोळ बाजारात एका पपईसाठी चाळीस ते साठ रुपये मोजावे लागत आहे. पपईचे दर आवाक्याबाहेर गेल्याने फ्रूट प्लेटमधून पपई हळूहळू गायब होत असल्याचे चित्र आहे.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात सोलापूर, अहिल्यानगर, सातारा तसेच पुणे जिल्ह्यातून पपईची आवक होते. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्याचा सर्वाधिक वाटा असतो. एरवी या हंगामात दररोज १५ ते २० गाड्यांमधून सुमारे ४० ते ५० टन पपईची आवक होत असते. मात्र, सध्या केवळ ४ ते ५ गाड्यांमधून १० ते १५ टन पपई बाजारात दाखल होत आहे.

सध्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने पपईची मागणी वाढली आहे. मात्र, उत्पादन घटल्याने बाजारात आवक निम्म्याहून अधिक घटली आहे. बाजारात मागणी आणि पुरवठ्यात मोठी तफावत निर्माण झाली आहे. त्यामुळे पपईच्या दरात मोठी वाढ झाली असून, एरवी प्रतिकिलो १५ ते २० रुपये दर मिळणाऱ्या पपईला सध्या २५ ते ४० रुपये प्रतिकिलो असा विक्रमी भाव मिळत आहे.

उन्हामुळे पपईचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटल्याने मार्केट यार्डातील आवक निम्म्यावर आली आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने चांगल्या दर्जाच्या पपईला प्रतिकिलो २५ ते ४० रुपये असा विक्रमी भाव मिळत आहे. सध्याची परिस्थिती कायम राहिल्यास दर तेजीतच राहतील. साधारणत: आठवडाभरानंतर पपईची आवक वाढण्याची शक्यता असून, त्यानंतर दर काहीसे खाली येण्याची शक्यता आहे.
पांडुरंग सुपेकर, पपई व्यापारी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT