Vehicle Vandalism Pudhari
पुणे

Pune Vehicle Vandalism Case: पुण्यात मध्यरात्री १८ जणांच्या टोळक्याचा धुडगूस; पद्मावतीत चारचाकींची तोडफोड करून दहशत

सहा दुचाकींवरून आलेल्या टोळक्याने लोखंडी हत्यारांनी फोडल्या वाहनांच्या काचा; सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून शोध सुरू

पुढारी वृत्तसेवा

पुणे: सहकारनगर परिसरातील पद्मावतीमध्ये मध्यरात्री सहा दुचाकींवरून आलेल्या सुमारे १८ जणांच्या टोळक्याने धुडगूस घालत पार्क केलेल्या चारचाकी वाहनांची तोडफोड केली. लोखंडी हत्यारांच्या साहाय्याने वाहनांच्या काचा फोडून परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण करण्यात आले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिक घाबरून घराबाहेर आले. मात्र, आरोपींनी क्षणार्धात तेथून पलायन केले. या घटनेमुळे सहकारनगर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी अज्ञात १८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी नीलेश उमेश मोहिते (वय ३८, रा. मल्हार मार्तंड सोसायटी, पद्मावती, सहकारनगर क्र. १) यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात १८ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ जुलै रोजी मध्यरात्री सुमारे एक वाजेच्या सुमारास मल्हार मार्तंड सोसायटीजवळ हा प्रकार घडला. फिर्यादी यांच्या घरासमोर दोन चारचाकी वाहने पार्क करून ठेवण्यात आली होती. त्याचवेळी सहा दुचाकींवरून आलेले १८ जण परिसरात दाखल झाले. त्यांच्यापैकी एका आरोपीने हातातील लोखंडी हत्याराने दोन्ही वाहनांच्या काचा जोरदार फोडल्या.

काही क्षणांतच वाहनांचे मोठे नुकसान झाले. काचा फुटल्याचा मोठा आवाज ऐकून नागरिक घराबाहेर धावले. मात्र, आरोपींनी परिसरात दहशत निर्माण करत घटनास्थळावरून वेगाने पळ काढला. या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या टोळक्याचा नेमका उद्देश काय होता, तसेच कोणाला लक्ष्य करण्यासाठी ही तोडफोड केली होती का, याचा तपास पोलिसकरत आहेत.

घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्या आधारे आरोपींची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. या टोळक्याचा यापूर्वीच्या अशाच प्रकारच्या घटनांशी काही संबंध आहे का, याचाही तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. परिसरात गस्त वाढविण्यात आली असून, आरोपींचा शोध सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT