प्रसाद जगताप
पुणे: शहरात सध्या अधिक नफा कमावण्याच्या हव्यासामुळे मालवाहू वाहनचालकांकडून नियमांची पायमल्ली होत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले. छोटा हत्ती तसेच मोठ्या टेम्पो, ट्रकमधूनही लोखंडी सळया, लोखंडी पाण्याचे पाइप आणि मंडपाचे बांबू यांची अत्यंत धोकादायक पद्धतीने वाहतूक सुरू आहे. दै. ’पुढारी’ने शहरात केलेल्या पाहणीत हा प्रकार उघडकीस आला असून, यामुळे सर्वसामान्य इतर वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या जिवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. या वाहनांमधून पाइप, सळया, बांबू अक्षरश: पाच-सहा फूट बाहेर निघाल्याचे दिसून येते. या वस्तू रस्त्यावर वाहन धावताना घसरून पडल्या तर इतर दुचाकी, चारचाकी वाहनांचा अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देत आरटीओ आणि पुणे शहर पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवून बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
नियमांचे उल्लंघन आणि वाढता धोका
शहरातील मुख्य रस्ते असोत वा अरुंद गल्ल्या, सर्वत्र ओव्हरलोड वाहने बिनदिक्कतपणे धावताना दिसत आहे. विशेषतः लोखंडी सळया आणि पाइप वाहनातून कित्येक फूट बाहेर आलेले असतात. वळण घेताना किंवा अचानक बेक लावल्यास ही वाहने पाठीमागून येणाऱ्या दुचाकीस्वारांसाठी कर्दनकाळ ठरू शकतात. फक्त अतिरिक्त ट्रिप वाचविण्यासाठी आणि जास्तीचे पैसे मिळविण्यासाठी वाहनमालक आणि चालक नियमांना केराची टोपली दाखवत असल्याचे दिसून येत आहे.
शहरात ओव्हरलोड वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्याचे प्राथमिक अधिकार आरटीओकडे आहेत. गस्त घालत असताना किंवा नाकाबंदीदरम्यान अशी ओव्हरलोड वाहने दिसल्यास आम्ही ती तत्काळ थांबवून बाजूला घेतो. वाहनचालकांना नियमांची जाणीव करून दिली जाते. अत्यंत धोकादायक पद्धतीने सळया किंवा बांबू वाहतूक करणाऱ्यांवर थेट गुन्हे देखील दाखल करीत आहोत. वाहतूक पोलिसांकडून सातत्याने समज देण्याचे आणि कारवाईचे काम सुरू आहे.हिम्मत जाधव, पोलिस उपायुक्त, पुणे शहर वाहतूक पोलिस शाखा
प्रशासकीय पातळीवर कारवाईचे दावे केले जात असले, तरी प्रत्यक्ष रस्त्यावर मात्र परिस्थिती बिकट आहे. एखादा मोठा अपघात झाल्यावरच प्रशासनाला जाग येणार का? अशा धोकादायक वाहतुकीमुळे रस्ते असुरक्षित झाले असून, यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज आहे. ओव्हरलोड वाहन रस्त्यावर धावताना आढळल्यास त्याचा परवाना कायमस्वरूपी रद्द करावा, तरच बेशिस्त वाहनचालकांना जरब बसेल. अशीच कारवाई अतिरिक्त प्रवासी भरणाऱ्या वाहनांवर करावी. याच अवजड गाड्यांखाली आत्तापर्यंत अनेकांचे जीव गेले. त्यामुळे आरटीओ, वाहतूक पोलिसांनी अवजड वाहनचालकांवर कडक कारवाई करावी.अतुल जैन, रस्ता सुरक्षा टीम इंडिया
ओव्हरलोड वाहतूक करणे हा फक्त नियमांचा भंग नसून, तो मानवी जिवाशी खेळ आहे. आरटीओकडून अशा वाहनांवर सातत्याने विशेष मोहिमेद्वारे कारवाई केली जात आहे. मालवाहू वाहनचालकांनी अधिकच्या नफ्यासाठी ओव्हरलोड वाहतूक करू नये. ओव्हरलोड वाहन आढळले, तर संबंधित वाहनचालकावर 20 हजार रुपये दंड आकारला जात आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पथक बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि येणाऱ्या काळात ही कारवाई अधिक तीव केली जाईल.स्वप्निल भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे