Fake Police Robbery Pudhari
पुणे

Pune Robbery Case: एक कोटीच्या दरोडा प्रकरणात तोतया पत्रकार अटकेत; दोन पोलिस कर्मचारी सहआरोपी, पुणे ग्रामीण पोलिस दलात खळबळ

खेड शिवापूर पोलिस चौकीतील ‘पैसे फेकाफेकी’ प्रकरणाला कलाटणी; २० लाखांची रोकड जप्त, महिला हवालदार व पोलिस नाईक फरार

पुढारी वृत्तसेवा

पुणे: एक कोटीच्या दरोडा प्रकरणात नऱ्हे पोलिसांनी तोतया पत्रकार आशिष तिवारी याला शुक्रवारी (दि. २४) रात्री अटक केली. तर, राजगड पोलिस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या खेड शिवापूर पोलिस चौकीत नेमणुकीस असलेल्या महिला पोलिस हवालदार प्रमिला शरद निकम आणि पोलिस नाईक अजिज जब्बार इसुब मेस्त्री या दोघांना सहआरोपी करण्यात आले आहे. दोघे पोलिस सध्या फरार असून, अटकेनंतर तिवारीला न्यायालयाने २७ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पैसे फेकाफेकीच्या या घटनेत एका व्यक्तीचा पाय देखील फ्रॅक्चर झाला होता. दरोड्याच्या गुन्ह्यात दोघा पोलिसांना सहआरोपी करण्यात आल्याने पुणे ग्रामीण पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणात या अगोदर विक्रम विलास चाकणकर (वय ४४), अमेय अरविंद कार्ले (वय ४६), गणेश रमेश कदम (वय ३३, सर्व रा. धायरी) या तिघांना अटक केली आहे. तर, दोन पोलिसांसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दैनिक 'पुढारी'ने प्रथम 'खेडशिवापूर पोलिस चौकीत पैशांची फेकाफेक आणि पीआय आले, पैशांचा पाऊस पडला अन्‌ बिंग फुटले' या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करून या घटनेकडे लक्ष वेधले होते. त्यानंतर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश पोलिस उपायुक्त सागर कवडे यांना दिले होते. याप्रकरणी याबाबत हर्षवर्धन भूषण पवार (वय ३५, रा. कृष्णकृपा अपार्टमेंट, तपोधाम कॉलनी, तळेगाव दाभाडे) यांनी नर्‍हे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. व्यावसायिक पवार यांना पोलिस चौकीत घेऊन आल्यानंतर महिला पोलिस हवालदाराने तोतया पत्रकाराच्या साथीने बॅगेतील २० लाख रुपये काढून घेतल्याचा आरोप आहे. राहिलेले साडेसहा लाख रुपये मुद्देमालात दाखविण्याचा त्यांचा डाव होता.

मात्र, हा प्रकार राजगड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष जाधव यांच्या कानावर पडला आणि हा प्रकार समोर आला. व्यावसायिकाच्या बॅगेतून काढलेली रोकड तोतया पत्रकाराने आपल्या मोपेड दुचाकीच्या डिकीत ठेवली होती. ती रोकड काढून देण्यास महिला पोलिस हवालदाराने मदत केली, असा आरोप आहे. मात्र, प्रकरण अंगलट येत असल्याचे लक्षात येताच त्यांनी ही रोकड परत व्यावसायिकाच्या ताब्यात दिली होती. खेडशिवापूर पोलिस चौकीत सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. मात्र, त्यांच्या या कृत्याचा सर्व प्रकार समोरील एका हॉटेलच्या कॅमेऱ्यात कैद झाला होता. याबाबतच गोपनीय अहवाल पोलिस निरीक्षक जाधव यांनी पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल्ल यांच्याकडे सादर केला होता. तसेच, या प्रकरणाच्या अनुषंगाने असलेले सीसीटीव्ही फुटेज जाधव यांनी नऱ्हे पोलिसांना दिले होते. त्यानंतर चौकशीअंती ही कारवाई करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

शनिवारी (दि. १८) दुपारी दोनच्या सुमारास सिंहगड रस्त्यावर पोलिस असल्याचे सांगून हर्षवर्धन पवार यांच्याकडील एक कोटी रुपयांची रोकड लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. हर्षवर्धन पवार हे त्यांचे सहकारी किरण आपटे हे विक्रम चाकणकर याच्या कारमध्ये बसून नऱ्हे येथील एचडीएफसी बॅंकेच्‍या दिशेने नवले ब्रिजवरून जात होते. त्‍या वेळी अचानकपणे दुचाकीरून काही जण आले. त्‍यांनी कारला त्‍यांच्‍या दुचाक्या आडव्या घातल्‍या. या वेळी अमेय कार्ले हा कारजवळ येऊन, "आम्ही पोलिस आहोत. तुम्ही दोन नंबरचा माल घेऊन चालला आहात, याची आम्हाला माहिती आहे," असे सांगत कारचे दरवाजे उघडण्यास भाग पाडले. त्यानंतर आरोपींनी कारमधील हिरव्या रंगाची बॅग आणि आणखी एक बॅग ज्‍यात एकूण एक कोटी रुपये होते ते हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात आपटे ७३ लाख ५० हजार रुपयांची पिशवी असलेली बॅग घेऊन खाली उतरले. त्यानंतर पवार यांना घेऊन कार थेट खेडशिवापूर पोलिस चौकीत गेली होती. प्रकार नऱ्हे पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला असताना आरोपी व्यावसायिकाला खेडशिवापूर पोलिस चौकीत का घेऊन गेले? असे अनेक सवाल याबाबत उपस्थित केले जाऊ लागले होते. तसेच, या कारच्या संदिग्ध हालचाली देखील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या होत्या.

गाडीच्या डिकीत वीस लाखांची रोकड

तोतया पत्रकार तिवारीच्या मोपेड गाडीच्या डिकीत चोरीची २० लाखांची रोकड आढळून आली आहे. त्याच्याकडून ती गाडी जप्त करायची आहे, त्याने इतर आरोपी व पोलिस अंमलदारांसोबतच्या संगनमताची माहिती, कटाची आखणी कशी झाली, त्यामध्ये कोणाची काय भूमिका होती, तसेच फिर्यादीचे २० लाख नेमके कशा प्रकारे वितरित करण्यात येणार होते, याचा तपास करणे आवश्यक आहे. तिवारी तसेच गुन्ह्यातील सहआरोपी आकाश ऊर्फ मुन्ना गायकवाड, प्रमोद यादव आणि संबंधित पोलिस अंमलदार हे २० लाख रुपयांचा कशाप्रकारे विनियोग करणार होते, याचा तपास करायचा आहे. या प्रकारचे अन्य गुन्हे आरोपींनी केले आहेत का, याचाही तपास केला जाणार आहे. आरोपी खेडशिवापूर पोलिस चौकीत प्रत्यक्ष हजर होता. त्या अनुषंगाने त्यास समक्ष नेऊन पाहणी करायची आहे, तसेच आरोपी व इतर संबंधितांमध्ये मोबाईलद्वारे संपर्क झाला होता का, यासाठी मोबाईलचे वैज्ञानिक विश्लेषण करण्याची गरज असल्याचे पोलिसांनी न्यायालयात स्पष्ट केले आहे. त्यामुळे तपासाच्या दृष्टीने आरोपीची पोलिस कोठडी आवश्यक असल्याचे पोलिसांचे न्यायालयाला सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT