पुणे: खडकवासला धरणसाखळीतील मर्यादित पाणीसाठ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने सोमवारपासून शहरात सम-विषम तारखेनुसार पाणीपुरवठा सुरू केला आहे. या नव्या व्यवस्थेची अंमलबजावणी सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने विशेष तयारी केली आहे.
पाणीपुरवठा विभागातील काही कनिष्ठ अभियंते आणि उपअभियंत्यांच्या अलिकडेच बदल्या झाल्या असल्या, तरी संबंधित भागांच्या जल वितरणव्यवस्थेची सखोल माहिती असल्याने त्यांच्यावरच अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
महापालिका प्रशासनाच्या मते, नव्या पाणीपुरवठा व्यवस्थेच्या सुरुवातीच्या काळात तांत्रिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
जलवाहिन्यांचे जाळे, वितरणपद्धती आणि स्थानिक समस्या, यांची माहिती असलेले अधिकारी प्रत्यक्ष क्षेत्रात कार्यरत राहिल्यास तक्रारींचे तत्काळ निराकरण करणे शक्य होणार आहे. सम-विषम पद्धतीच्या अंमलबजावणीच्या पहिल्याच दिवशी किरकोळ तक्रारी प्राप्त झाल्या. सोमवारी सम तारखांच्या भागांना नियोजित वेळेनुसार पाणीपुरवठा करण्यात आला.
मंगळवारी सम तारखांच्या भागांत पाणीपुरवठा सुरळीत झाला. दुसऱ्या दिवशी देखील फार तक्रारी मिळाल्या नाहीत, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी सांगितले.