पुणे

Pune News : वायसीएममधील एचबीओटी मशीन वापराविनाच

Laxman Dhenge

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेने पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयासाठी कोट्यवधी रुपये खर्च करू न11 वर्षांपूर्वी एचबीओटी मशीन खरेदी केली. या मशीनचा सुरुवातीला काही काळ वापर झाला. मात्र, त्यानंतर ही मशीन नादुरुस्त झाल्याने सध्या वापराविना पडून आहे. आता ही मशीन कंत्राट तत्त्वावर चालविण्यास देण्याचा विचार सुरू आहे. महापालिका प्रशासनाने वायसीएम रुग्णालयासाठी मल्टीपल हायपरबेरिक ऑक्सिजन चेंबर विथ एअर लॉक सिस्टीम म्हणजेच एचबीओटी मशीन खरेदी करण्याचे आदेश 31 मे 2012 रोजी देण्यात आले. तर, 1 डिसेंबर 2012 रोजी मशीनचा पुरवठा करण्यात आला. 30 जानेवारी 2013 रोजी प्रत्यक्ष मशीनचे इन्स्टॉलेशन करण्यात आले.

या मशीनसाठी 2 कोटी 79 लाख रुपये इतका खर्च करण्यात आला. झालेला अवाजवी खर्च हा त्या वेळी मोठा चर्चेचा मुद्दा झाला होता. त्यामुळे ही मशीन खरेदी वादग्रस्त ठरली होती. वायसीएम रुग्णालयात ही मशीन बसविल्यानंतर काही कालावधीने कुलिंग सिस्टीमअभावी बंद पडली. त्याच्या दुरुस्तीसाठी 7 लाख 17 हजार रुपये इतका खर्च येणार होता. मात्र, हा खर्च टाळून ही मशीनच त्रयस्थ संस्थेला चालविण्यास देण्याचे नियोजन ठरले होते. वायसीएम रुग्णालयात मशीन चालविण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाचा अभाव असल्याचे कारण देत त्यासाठी कार्यवाही सुरू करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात ही मशीन अद्याप चालविण्यास देण्यात आलेली नाही किंवा तिचा वापरही होत नसल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.

वायसीएम रुग्णालयातील एचबीओटी मशीन नादुरुस्त झाल्याने बंद स्थितीत आहे. या मशीनच्या दुरुस्तीसाठी 10 ते 12 लाखांचा खर्च येणार आहे. तथापि, हा खर्च करण्याऐवजी ही मशीन निविदा मागवुन चालविण्यास देण्याचे नियोजन सुरु आहे. आयुक्तांची मंजुरी मिळाल्यानंतर ही कार्यवाही केली जाणार आहे.

– डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, वायसीएम रुग्णालय, पिंपरी

हेही वाचा

SCROLL FOR NEXT