Crime News : दरोडा टाकणारे निघाले होमगार्ड, दोघांना पकडले; तीन फरार | पुढारी

Crime News : दरोडा टाकणारे निघाले होमगार्ड, दोघांना पकडले; तीन फरार

भुसावळ : यूट्यूबच्या माध्यमातून भुसावळ येथे सफेद भिलावा उपलब्ध असल्याचे सांगून तेलंगणातील तरुणांना मारहाण करून त्यांना लुटण्याचा प्रकार झाला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला पकडले असता त्यामध्ये दोन होमगार्ड यांचा समावेश असल्याचे निष्पन्न झाले असून दोघांना अटक करण्यात आली आहे. तर तीन फरार झालेले आहेत. दोघाही होमगार्ड यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे

युट्युब वर सफेद भिलावा असल्याची माहिती टाकण्यात आली होती व त्याखाली नंबर देण्यात आला होता. या नंबर वर तेलंगणातील मिलवकुमार पूनम (28, कोयागुड्डम मंडळ तेगुपल्ली, जि.बद्रादी, तेलंगणा त्यांचा मित्र बुकीया हरीलाल, यांनी संपर्क साधला असता त्यांना सफेद भिलावा घेण्यासाठी भुसावळ येथे बोलवण्यात आले. ठरल्याप्रमाणे सोमवार, 11 डिसेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता भुसावळ स्थानकावर ते आले. त्यांना भुसावळ तालुक्यातील साक्री फाटा जुना टोल नाक्या जवळील खदानीत नेऊन काठीने मारहाण केली. संशयित आरोपी यांनी यावेळी 20 हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल, 20 हजारांची रोकड, 20 हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी असा एकूण 60 हजारांचा ऐवज हिसकावून आरोपी फरार झाले.

पूनम याने भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाणे गाठत आपबिती सांगितली. तक्रारदार पूनम यांनी ज्या नंबर वर संपर्क साधला होता त्या नंबरशी संपर्क साधून रेल्वेच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित आरोपी विनोद चंद्रकांत सोनवणे (30, जाडगाव, ता.भुसावळ) व नरेंद्र विकास सपकाळे (30, साक्री फाटा, भुसावळ) यांना अटक करण्यात आली. ज्या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेले आहे ते होमगार्ड पथकामध्ये कार्यरत आहेत. तपास पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक हरीष भोये करीत आहेत.

सफेद भिलावा देण्याच्या बहाण्याने झालेल्या लुटीतही कुर्‍हा काकोडातील चार संशयित असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पसार तीन संशयितांचा भुसावळ बाजारपेठ पोलिसांकडून कसून शोध सुरू करण्यात आला आहे.

हेही वाचा :

Back to top button