पुणे : पुढारी वृत्तसेवा : विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली हाणामारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण, राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून विद्यार्थ्यांना मारहाण अशा काही अशैक्षणिक घटनांमुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे शैक्षणिक संकुल धुमसत आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये; तसेच कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेता विद्यापीठ प्रशाससाने शैक्षणिक संकुलात सभासद नोंदणी, विविध अभियान, कार्यक्रम, उपक्रम, आंदोलन आदींसाठी परवानगी मिळणार नसल्याचे जाहीर केले आहे.याबाबतचे परिपत्रक पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी प्रसिद्ध केले आहे.
या परिपत्रकाचा फटका आता विद्यार्थ्यांसोबतच विद्यार्थी संघटना, विविध शैक्षणिक उपक्रम आणि सामाजिक संस्थांना बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पूर्वपरवानगीशिवाय अशा पद्धतीने कार्यक्रमांचे आयोजन करणार्यांवर कायदेशीररीत्या कारवाई करण्यात येणार असल्याचेही डॉ. पवार यांनी जाहीर केले आहे. विद्यापीठात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असणार्या अशैक्षणिक घटनांमुळे, विद्यापीठाच्या संकुलाची तुलना ही थेट जेएनयूमध्ये होणार्या घटनांशी करण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांच्या घटनांमुळे, विद्यापीठाची प्रतिमा डागाळली असून, त्याचा फटका विद्यापीठाला आगामी काळत बसण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठातील प्रशासकीय यंत्रणा आणि सुरक्षा व्यवस्था अलर्ट मोडवर आहे. त्यामुळेच विद्यापीठामध्ये येणार्या प्रत्येकाची चौकशी आणि नोंदणी करूनच, प्रवेश दिला जात आहे. त्याचप्रमाणे वसतिगृहात केवळ रहिवासी विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. या दोन्हींचा फटका हा प्रामुख्याने विद्यार्थ्यांनाच बसणार असून, अनेक शैक्षणिक उपक्रमांना विद्यार्थ्यांना मुकावे लागण्याची शक्यता आहे.
विद्यापीठाच्या शैक्षणिक संकुलात सभासद नोंदणी, विविध अभियान, कार्यक्रम, उपक्रम, आंदोलन आदी उपक्रम घ्यायचे असल्यास, विद्यापीठाच्या प्रशासनाची आणि पोलिसांची परवानगी घेणे आवश्यक राहणार आहे. ही परवानगी न घेणार्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे विद्यापीठाने जाहीर केले आहे.
हेही वाचा