पुणे

Pune News : कला, संस्कृतीचा अनोखा ‘तरंग’

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पोलिस दलातील विविध शाखांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना व्हावी, पोलिस आणि जनतेतील संवाद वाढावा, यासाठी पुणे पोलिसांनी आयोजित केलेला तरंग-2023 उत्सव उत्साहात पार पडला. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मातीची भांडी, पर्यावरणपूरक प्लास्टिक पदार्थाचे पुनर्प्रकल्पाने उपयोगी वस्तू, तांबे, पितळ या भांड्याचे प्रदर्शन, तसेच फुलेझाडे, रोपवाटिका पुस्तक स्टॉल इत्यादी यांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते.

नवीन पिढी, लहान बालके यांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी म्हणून विज्ञान प्रदर्शन, मुलांसाठी खेळप्रकार, व्हिडिओच्या माध्यमांतून लहान बालकांसाठी गुड टच, बॅड टच यासारखे प्रबोधनपर प्रदर्शन 'किड्स झोन' माध्यमांतून प्रदर्शित करण्यात आले होते. ऑर्केस्ट्रा आणि मराठी सिनेसृष्टीतील नामवंत कलाकार इतर सेलिब्रिटी यांचे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
पोलिस घटकांशी संबधित क्वीक रिस्पोन्स टीम डेमो, एस.आर.पी.एफ पाईप बँडचे सादरीकरण, डॉग शो, किड्स झोन पोलिस दलातील कलाकार यांनी सादर केलेल्या नृत्य गायन व इतर कला, गार्ड ऑफ ऑनरसाठी महिला पोलिस अंमलदार यांनी त्याबाबत सादरीकरण केले.

मेळाव्यास गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, माजी पोलिस महासंचालक अजित पारसनीस, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, अप्पर पोलिस महासंचालक निकेत कौशिक, विशेष पोलिस महानिरीक्षक, (एसआरपीएफ) अशोक मोरोळे, सिनेकलाकार मीनाक्षी शेषाद्री, वैशाली जाधव, ऋतुजा जुन्नरकर, प्रिया बेर्डे, मकरंद अनासपुरे, मृणाल कुलकर्णी, प्राजक्ता गायकवाड, अमृता खानविलकर आदी कलाकारांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदविला.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT