पुणे

Pune News : नववर्ष स्वागतासाठी डेक्कन, लष्कर भागात वाहतूक बदल

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे स्वागत करण्यासाठी लष्कर भागातील महात्मा गांधी रस्ता तसेच फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्त्यावर पुणेकरांची मोठी गर्दी होते. त्या पार्श्वभूमीवर वाहतूक विभागाने रविवारी (31 डिसेंबर) सायंकाळी पाचनंतर लष्कर आणि डेक्कन जिमखाना भागात वाहतूक बदल केले आहेत. मध्यरात्री गर्दी ओसरेपर्यंत या परिसरातील वाहतूकव्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत, अशी माहिती वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिली.

फर्ग्युसन रस्ता आणि जंगली महाराज रस्त्यावरील वाहतूक बदल

कोथरूड आणि कर्वे रस्त्याकडून येणारी वाहतूक खंडोजीबाबा चौक येथे बंद करण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक विधी महाविद्यालय रस्ता, प्रभात रस्ता, अलका चित्रपटगृहाकडे वळविण्यात येणार आहे.
जंगली महाराज रस्त्यावर होणारी गर्दी विचारात घेऊन झाशीची राणी चौकातून वाहतूक बंद करण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक गोखले स्मारक चौक, उपरस्ते, पुणे महापालिका भवन, ओंकारेश्वर मंदिर, छत्रपती शिवाजी रस्तामार्गे वळविण्यात येणार आहे.

15 ऑगस्ट चौकातील वाहतूक बंद

वाय जंक्शनकडून महात्मा गांधी रस्त्याकडे येणारी वाहतूक 15 ऑगस्ट चौक येथे बंद करून वाहतूक कुरेशी मशीद आणि सुजाता मस्तानी चौकाकडे वळविण्यात येणार आहे. इस्कॉन मंदिराकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्ता तसेच अरोरा टॉवर्सकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. व्होल्गा चौकातून महंमद रफी चौकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक ईस्ट स्ट्रीटवरून इंदिरा गांधी चौकाकडे वळविण्यात येणार आहे. इंदिरा गांधी चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक लष्कर पोलिस ठाण्याकडे वळविण्यात येणार आहेे. सरबतवाला चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे.

महात्मा गांधी रस्ता, फर्ग्युसन रस्ता वाहनांसाठी बंद

लष्कर भागातील महात्मा गांधी रस्ता परिसरात रविवारी (31 डिसेंबर) सायंकाळी पाचनंतर वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. महात्मा गांधी रस्त्यावरील 15 ऑगस्ट चौक ते अरोरा टॉवर्स चौकदरम्यान वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. फर्ग्युसन रस्त्यावरील गोखले स्मारक चौक ते फर्ग्युसन महाविद्यालय प्रवेशद्वारापर्यंत वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. पहाटे पाचपर्यंत वाहनांना बंदी राहणार आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT