पुणे : पुढारी वृत्तसेवा : 'दिगंबरा, दिगंबरा… श्रीपाद वल्लभ दिगंबरा…'च्या जयघोषात, भक्तिगीतांच्या सुरेल वातावरणात, भजन-कीर्तनाच्या भक्तिरंगात रंगून अन् मनोभावे श्रीदत्त महाराजांचे दर्शन घेत भाविकांनी मंगळवारी श्रीदत्त जयंती उत्साहात साजरी केली. रांगोळ्यांच्या पायघड्या आणि फुलांच्या सजावटीसह विद्युतरोषणाईने मंदिर परिसर उजळून निघाले. मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आणि श्रीदत्त महाराजांकडे सुख-समृद्धीची, भरभराटीची कामना केली.
या वेळी मंदिरांमध्ये उत्साही आणि भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले आणि अभिषेक, महापूजा-आरती, दत्त याग, सत्यनारायण पूजेसह सायंकाळी मंदिरांमध्ये पारंपरिक पद्धतीने श्रीदत्त जन्मसोहळा पार पडला. घरोघरीही प्रथेप्रमाणे पूजाअर्चा करण्यात आली.
फुलांच्या आकर्षक रचना आणि दीपमाळांनी सजवलेल्या मंदिर परिसरात दिवसभर वैविध्यपूर्ण धार्मिक – सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल अनुभवायला मिळाली. अभिषेक, महापूजा-आरती, दत्तयाग, सत्यनारायण पूजेचे आयोजन केले होते. त्याशिवाय भजन-कीर्तनाच्या कार्यक्रमांनी भक्तिमय वातावरण निर्मिले.
या आधी दत्त जन्माचे कीर्तन झाले. सायंकाळी मंदिरांमध्ये प्रथेप्रमाणे श्रीदत्तजन्म सोहळा पार पडला. पाळण्यावर पुष्पवृष्टी करून जयघोष करण्यात आला. त्यानंतर वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते. भाविकांनी महाप्रसादाचा लाभही घेतला. रात्रीपर्यंत मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी पाहायला मिळाली. भाविकांनी यानिमित्ताने उपवासही केला. मध्यवर्ती पेठांसह नवी पेठ, डेक्कन परिसर, पर्वती, शिवाजीनगर आदी भागांतील मंदिरांमध्ये श्रीदत्त जयंती उत्सवाचे आयोजन केले होते. सायंकाळी काही ठिकाणी मिरवणुका काढण्यात आल्या.
खजिना विहीर श्रीदत्त मंदिरातही सकाळपासून भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली. फुलांनी मंदिर सजविण्यात आले होते अन् दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल होती. दत्तयागासह विविध धार्मिक कार्यक्रम आयोजिले होते. सायंकाळी श्रीदत्त जन्मसोहळा झाला. तसेच भजन-कीर्तनाचे कार्यक्रमही आयोजित केले होते. भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला, असे मंदिराचे अविनाश
आपटे आणि विजय भोसले यांनी सांगितले.
कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरात सायंकाळी 6 वाजून 3 मिनिटांनी श्रीदत्त जन्मसोहळा उत्साहात पार पडला. पाळण्यावर पुष्पवृष्टी करून जयघोष करण्यात आला. महिला कीर्तनकार रेशीम खेडकर यांच्या दत्तजन्माच्या कीर्तनानंतर पाळणा होऊन आतषबाजी करून सोहळा संपन्न झाला. यानिमित्त मंदिराला फुलांची आकर्षक आरास करण्यात आली होती तसेच विद्युतरोषणाई देखील करण्यात आली.
यानिमित्ताने सकाळी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले होते. प्रातः आरती आमदार रवींद्र धंगेकर व प्रतिभा धंगेकर यांच्या हस्ते झाली. माध्यान्ह आरती पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, सौरभ आणि राधिका गाडगीळ, राजकुमार चोरडिया यांच्या हस्ते झाली. श्री दत्तजन्म सोहळ्यानंतर सायंकाळी पालखी नगरप्रदक्षिणा व विशेष आरतीचे आयोजन करण्यात आले. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या हस्ते सायंआरती होऊन पालखी नगरप्रदक्षिणेचा शुभारंभ करण्यात आला. दिवसभर प्रसाद वाटप सुरू होते.
हेही वाचा