पुणे

Pune News :ससून अधिष्ठातापद; अध्यादेशाची प्रतीक्षाच

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठातापदावरून डॉ. संजीव ठाकूर यांना 10 नोव्हेंबर रोजी पदमुक्त करण्यात आले. मात्र, या निर्णयानंतर 12 दिवस उलटूनही डॉ. ठाकूर यांच्या पदमुक्तीची ऑर्डर अजून निघालेलीच नाही. अस्थिरोग विभाग पथकाचे प्रमुख डॉ. प्रवीण देवकाते यांच्यावर निलंबनाची कारवाई करून तत्काळ दुस-या दिवशी ऑर्डर जारी करण्यात आली. हीच तत्परता डॉ. ठाकूर यांच्याबाबत अद्याप का दाखवण्यात आलेली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ड्रग तस्कर ललित पाटील प्रकरणानंतर डॉ. ठाकूर यांची गच्छंती होणार, हे स्पष्ट झाले होते. त्याच वेळी, माजी अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांच्या बाजूने 'मॅट'ने निर्णय दिल्यावर सुमारे चार-पाच महिने चाललेल्या खटल्याचा निकाल डॉ. ठाकूर यांच्या विरोधात लागला आणि न्यायालयाने पदमुक्तीचा निर्णय दिला. न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर वैद्यकीय शिक्षण विभागाला उशिरा जाग आली आणि ललित पाटील प्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालावरून डॉ. ठाकूर यांचा पदभार काढून घेण्यात आला.

डॉ. ठाकूर यांच्यावरील आरोप सिध्द झाल्याने त्यांना निलंबित करण्याऐवजी अस्थिरोग विभाग पथकाचे प्रमुख डॉ. प्रवीण देवकाते यांना 'बळीचा बकरा' करून निलंबित करण्यात आले. डॉ. ठाकूर यांच्यावर मात्र निलंबनाची कारवाई करण्यात आली नाही. केवळ पदभार काढून घेण्यात आल्यानंतर त्याबाबतची ऑर्डर काढण्यातही वेळकाढूपणा होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

डॉ. काळे यांची ऑर्डरही प्रतीक्षेत

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर डॉ. संजीव ठाकूर यांना पदमुक्त करण्यात आले. आधी मॅटचा आणि नंतर न्यायालयाचा निर्णय माजी अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांच्या बाजूने लागला आहे. ससून प्रशासनाचा व्याप पाहता, डॉ. काळे यांचाही पुन्हा रुजू होण्याचा अध्यादेश तातडीने काढणे अपेक्षित होते. मात्र, अद्याप त्यांची ऑर्डरही काढण्यात आलेली नाही. डॉ. श्रीनिवास शिंत्रे यांच्याकडे प्रभारी पदभार देण्यात आला आहे. सध्या डॉ. शिंत्रे रजेवर असल्याने उपअधिष्ठाता डॉ. शेखर प्रधान पदभार सांभाळत आहेत.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT