पुणे

Pune News : युवा मतदारांची अधिकाधिक नाव नोंदणी करा : सौरभ राव

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : भारत निवडणूक आयोगाच्या वतीने घोषित करण्यात आलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करावी; तसेच नवीन युवा मतदारांची अधिकाधिक नोंदणी होण्याच्या दृष्टीने मोहीम स्तरावर काम करावे, अशा सूचना विभागीय आयुक्त तथा पुणे विभागासाठीचे मतदार यादी निरीक्षक सौरभ राव यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला.

याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी आमदार अ‍ॅड. अशोक पवार, उपायुक्त महसूल रामचंद्र शिंदे, अपर जिल्हाधिकारी अजय मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, उपजिल्हाधिकारी तथा स्वीप नोडल अधिकारी अर्चना तांबे, सहायक मतदार नोंदणी अधिकारी, तसेच विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते. राव म्हणाले, की भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम सुरू आहे.

या कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यात राबविण्यात येणार्‍या उपक्रमांची व्यापक स्वरूपात जनजागृती करण्यात यावी. यासाठी विविध राजकीय पक्ष, प्रसारमाध्यमे, सामाजिक संस्थांची मदत घ्यावी. 'स्वीप' कार्यक्रमाअंतर्गत मतदारसंघनिहाय मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करावे. या शिबिरांची माहिती सर्व संबंधित यंत्रणेला देण्यात यावी, असेही ते म्हणाले. मतदानप्रकियेत 18 ते 19 आणि 20 ते 29 या वयोगटातील युवकांचा सहभाग लोकसंख्येच्या प्रमाणात कमी आहे, यावर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. राजकीय पक्षासोबत समन्वय साधून विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेत त्यांना सक्रिय सहभागी करून घ्यावे, अशा सूचना त्यांनी केल्या.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT