पुणे

Pune News : कैदी समितीचे अध्यक्ष डॉ. धिवरे यांचा राजीनामा

अमृता चौगुले

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : ससून रुग्णालयाच्या कैदी समितीच्या अध्यक्षपदाचा डॉ. सुजित धिवरे यांनी राजीनामा दिला आहे. ललित पाटील प्रकरणानंतर निर्माण झालेल्या दबावातून त्यांनी राजीनामा दिला की त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आले? असा प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहे. ससूनचे उपअधीक्षक असलेले डॉ. धिवरे यांची 27 सप्टेंबर रोजी कैदी समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. यामध्ये त्यांच्यासह दोन डॉक्टर सदस्यांचा समावेश आहे. कैदी समिती स्थापन झाल्यावर आठवडाभरातच ड्रगतस्कर ललित पाटील रुग्णालयातून पळून गेला आणि ससूनच्या प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

कैद्यांच्या उपचारांबाबत, मुक्काबाबतच्या निकषांचे विश्लेषण करण्याची जबाबदारी समितीकडे देण्यात आली होती आणि अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. राज्य शासनाने नियुक्त केलेल्या समितीने शुक्रवारी ससूनचा सविस्तर अहवाल राज्य शासनाला सादर केला. त्यानंतर लगेच शनिवारी डॉ. धिवरे यांनी राजीनामा दिल्याचे समजते. याबाबत डॉ. धिवरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. मात्र, अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी अद्याप राजीनामा स्वीकारला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

ललित पाटीलला पोलिसांनी अटक केली असली, तरी ससून प्रशासनावरील टांगती तलवार अद्याप दूर झालेली नाही. पोलिसांनी कैद्यांच्या सर्व वैद्यकीय नोंदी ताब्यात घेतल्या आहेत. पाटील प्रकरणाचा कसून तपास सुरू असून, दररोज नवनवीन धागेदोरे समोर येत आहेत. चौकशी समितीचा अहवाल सादर झाल्यावर ससूनमधील डॉक्टरांवर कोणती कारवाई केली जाणार, हे स्पष्ट
होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच डॉ. धिवरे यांनी राजीनामा दिल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT