पुणे

Pune News : पाणी मीटरला विरोध ठरणार गुन्हा

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणी मीटर बसविण्यास विरोध असल्याने आता महापालिका प्रशासनाने कारवाईचा पवित्रा घेतला आहे. मीटर बसविण्यास विरोध करणार्‍या राजकीय कार्यकर्त्यांच्या विरोधात थेट पोलिस कारवाई करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली असून संबंधितांविरोधात थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

शहराच्या पाणीपुरवठ्यातील असमानता दूर करण्यासाठी महापालिकेने समान पाणीपुरवठा योजना हाती घेतली आहे. या योजनेंतर्गत सव्वातीन लाख पाणी मीटर बसविण्यात येणार असून दीड हजार कि.मी.च्या पाईपलाईन नव्याने टाकण्यात येणार आहेत. 2017 मध्ये या योजनेच्या प्रत्यक्ष कामाला सुरवात झाली. 2022 मध्ये या योजनेचे काम पूर्ण करण्याची मुदत होती. मात्र, आतापर्यंत प्रत्यक्षात केवळ 62 टक्के काम पूर्ण झाले आहे.

त्यात 1 लाख 34 हजार 580 मीटर बसवून झाले आहेत, तर जवळपास दोन लाख मीटर बसविणे बाकी आहे.
मुख्य सभा अस्तित्वात असताना नगरसेवकांकडून मीटर बसविण्यास विरोध केला जात होता.

आता प्रशासक काळात राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून मीटर बसविण्यास विरोध होत आहे. त्यात काही कार्यकर्ते थेट ठेकेदारांना ब्लॅकमेल करत आहेत. त्यामुळे हे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. त्यामुळे आता अशा काम थांबविणार्‍या कार्यकर्त्यांविरोधात कारवाईचा कडक पवित्रा घेतला आहे. अशा कार्यकर्त्यांविरोधात पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांनी थेट पोलिसांकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT