कोल्हापूर : ऊस दरावरून शेट्टी-खोत यांच्यात जुंपली

कोल्हापूर : ऊस दरावरून शेट्टी-खोत यांच्यात जुंपली
Published on
Updated on

कोल्हापूर : एकेकाळीऊस दराची मागणी जाहीर करून आंदोलनात आघाडीवर असणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि त्यांचेच एकेकाळचे सहकारी रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांच्यात ऊस दरावरून जुंपली आहे. एकाच दरासाठी संघर्ष करणारे हे नेते आता वेगवेगळे दर घेऊन आखाड्यात उतरले आहेत. एवढेच नव्हे, तर निवडणूक लढवण्याबाबत आव्हाने देण्यात आली आहेत. त्यामुळे ऊसपट्ट्यातील नेत्यांमधील हा संघर्ष चर्चेचा विषय ठरला आहे.

जयसिंगपूरच्या ऊस परिषदेत दर जाहीर करायचा आणि तो दर कारखानदारांनी द्यावा, यासाठी रस्त्यावरचा संघर्ष करायचा, अशी परिस्थिती होती. स्वाभिमानी शेतकरी संघटना काहीकाळ सत्तेत सहभागी झाली. संघटनेला मिळालेल्या मंत्रिपदावर सदाभाऊ खोत यांना संधी मिळाली. शेतकर्‍यांच्या जीवनाशी शेती खात्याचे राज्यमंत्रिपद खोत यांच्याकडे आले आणि त्यानंतर काही काळातच खोत आणि शेट्टी यांच्या वाटा वेगळ्या झाल्या. त्यातूनच खोत यांनी स्वाभिमानीला सोडचिठ्ठी देत रयतक्रांती संघटनेची स्थापना केली.

आता उसाच्या दरावरून पेटलेल्या संघर्षात हे दोन्ही नेते आखाड्यात परस्परविरोधात उतरले आहेत. राजू शेट्टी यांनी गेल्यावर्षी तुटलेल्या उसापोटी 400 रुपये मिळावेत आणि यंदा 3 हजार 500 रुपये दर मिळाला पाहिजे, अशी मागणी करून आंदोलन सुरू केले आहे. काही ठिकाणी ट्रॅक्टर पेटवल्याने आणि उसाच्या गाड्या उलट्या केल्याने आंदोलनाला हिंसक वळण मिळाले. संघटनेने महामार्ग रोको करून सरकारला इशारा दिला. आता याच मागणीसाठी राष्ट्रीय महामार्ग रोखण्याची घोषणा शेट्टी यांनी केली आहे.

सदाभाऊ खोत यांनी गेल्यावर्षी तुटलेल्या उसापोटी 200 रुपये आणि यंदाच्या उसाला 3 हजार 250 दराची मागणी केली आहे. हे करताना त्यांनी पुढे इथेनॉल आणि साखरेच्या किमतीवर आधारित अधिकच्या दरासाठी संघर्ष करता येईल, अशी भूमिका मांडली आहे.

मात्र खोत यांनी शेट्टी यांनी मागणी केलेला दर जर ते शेतकर्‍यांना देऊ शकले नाहीत, तर त्यांनी लोकसभा निवडणूक लढवू नये आणि जर शेट्टी हा दर शेतकर्‍यांना देऊ शकले, तर आपण लोकसभा लढवणार नाही, अशी घोषणा करून हा संघर्ष तीव्र केला आहे. आता एकेकाळच्या सहकार्‍यांनी एकमेकांविरुद्ध दंड थोपटल्याने राजकीय संघर्षाला धार आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news