पुणे; पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय कौशल्यविकास मंत्रालयातर्फे प्रधानमंत्री कौशल्यविकास योजनेंतर्गत देशभरातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये आता 'स्किल हब' स्थापन करण्यात येणार आहेत. देशात कौशल्यविकासाची परिसंस्था निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवून हा खास उपक्रम राबविला जाणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) ही माहिती परिपत्रकाद्वारे दिली. केंद्रीय कौशल्यविकास मंत्रालयातर्फे 2015 पासून प्रधानमंत्री कौशल्यविकास योजनेच्या माध्यमातून उद्योगांना आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी अल्प मुदतीचे कौशल्यविकास अभ्यासक्रम राबविले जात आहेत.
आता या योजनेची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय मंत्रालयाने घेतला आहे. त्यात कौशल्यविकास प्रशिक्षण संस्थांची संख्या वाढविणे, नोकरी करताना कौशल्य प्रशिक्षण, इंडस्ट्री 4.0 नुसार कौशल्य प्रशिक्षणावर भर दिला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात
आले आहे. या योजनेंतर्गत आता राष्ट्रीय स्तरावर लौकिक असलेल्या उच्च शिक्षण संस्थांमध्ये स्किल हब स्थापन करण्यात येणार आहे.
पारंपरिक कौशल्य प्रशिक्षण संस्थांच्या पलीकडे जाऊन कौशल्य प्रशिक्षणाची परिसंस्था निर्माण करण्याचा प्रयत्न याद्वारे केला जाणार आहे. या अनुषंगाने अभ्यासक्रम, रोजगाराच्या अनुषंगाने स्किल हब स्थापनेसाठीचा प्रस्ताव इच्छुक संस्थांनी स्किल इंडिया संकेतस्थळावर सादर करण्याची सूचना यूजीसीने उच्च शिक्षण संस्थांना केली आहे
हेही वाचा