थेट पाईपलाईनचे पाणी सोमवारी कोल्हापुरात : सतेज पाटील | पुढारी

थेट पाईपलाईनचे पाणी सोमवारी कोल्हापुरात : सतेज पाटील

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर शहरासाठी अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या थेट पाईपलाईन योजनेचे काम पूर्ण झाले आहे. तांत्रिक चाचण्या सुरू असून सोमवारी (दि. 30) काळम्मावाडी धरणातील पाणी कोल्हापुरातील पुईखडी येथील 80 एमएलडी क्षमतेच्या जल शुद्धीकरण केंद्रात पहिल्यांदाच पडणार आहे, अशी माहिती आ. सतेज पाटील यांनी पत्रकारांना दिली.

आ. सतेज पाटील यांनी काँग्रेसच्या नगरसेवकांसह पुईखडी येथे थेट पाईपलाईन योजनेच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. माजी उपमहापौर अर्जुन माने, भूपाल शेटे, मधुकर रामाणे, प्रवीण केसरकर, प्रताप जाधव उपस्थित होते. आ. पाटील म्हणाले, काळम्मावाडी धरण क्षेत्रातील योजनेंतर्गत दोन्ही जॅकवेल पूर्ण झाली आहेत. त्यावर 940 एच.पी. क्षमतेचे चार पंप बसविण्यात येत आहेत. त्यापैकी दोन पंप बसविले आहेत.

अत्याधुनिक स्काडा सिस्टीम…

काळम्मावाडी धरणातील पाणी कांडगावपर्यंत आणण्याची चाचणी यशस्वी झाली आहे. योजनेसाठी अत्याधुनिक
स्काडा सिस्टीमचा वापर केला आहे. पुईखडी, जल अभियंता कार्यालय आणि काळम्मावाडी धरण या ठिकाणी त्याचे नियंत्रण कक्ष आहे. 53 किलोमीटर लांबीची 1800 मि. मी. व्यासाची पाईपलाईन आहे. या पाईपलाईनला कुठेही गळती लागली तरी नियंत्रण कक्षातील स्क्रीनवर समजणार आहे. त्यामुळे गळती काढणे सोपे जाणार आहे, असेही आ. पाटील यांनी सांगितले. यावेळी आ. ऋतुराज पाटील, आ. जयश्री जाधव, काँग्रेसचे माजी गटनेते शारंगधर देशमुख प्रमुख उपस्थित होते. योजनेच्या पाहणीवेळी माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी नगरसेवक ईश्वर परमार, इंद्रजित बोंद्रे, सुभाष बुचडे, स्वाती यवलुजे, माधुरी लाड, शिवानंद बनछोडे यांच्यासह इतर उपस्थित होते.

योजना पूर्णत्वाचा मनस्वी आनंद : सतेज पाटील

कोल्हापूर शहराला स्वच्छ व मुबलक पाणी मिळावे यासाठी प्रयत्नशील होतो. थेट पाईपलाईन योजना मंजूर करून आणली. आता योजना पूर्णत्वास गेली आहे. लवकरच कोल्हापूरवासीयांना मुबलक पाणी मिळेल. पुईखडी जल शुद्धीकरण केंद्रात पाणी आल्यानंतर विविध जल शुद्धीकरण केंद्राद्वारे शहरात पाण्याचे वितरण केले जाणार आहे. त्यामुळे मनस्वी आनंद होत आहे, असेही आ. सतेज पाटील यांनी सांगितले.

Back to top button