पुणे : पुढारी वृत्तसेवा : नियमबाह्य पद्धतीने रात्री उशिरापर्यंत मद्यधुंद रात्र जागविणार्या हॉटेल्स, पबवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. अधीक्षक चरणसिंग रजपूत यांनी तयार केलेल्या विशेष पथकांकडून ही धडक कारवाई केली जात आहे. मागील चार दिवसांत नियमांचे उल्लंघन करणार्या पुणे शहरातील विविध भागांतील तब्बल 10 हॉटेल, पबवर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये अनेक नामांकित हॉटेल, पबचा समावेश आहे.
विमाननगर येथील लेमनग्रास रेस्टोरंट, शिरूर येथील हॉटेल काकाज, कल्याणीनगर येथील अॅनोनियम कॅफे, हॉटेल ट्वीन स्टार, कोरेगाव पार्क येथील हॉटेल फॅशन, मेट्रो लाउंज, नारंग व्हेचंर्स, प्लँज लाऊंज, आर्यन बार अँड ग्रील अशी कारवाई करण्यात आलेल्या हॉटेल, पबची नावे आहेत. शहरात हायप्रोफाईल हॉटेल, पब, रूफटॉप बारची संख्या मोठी आहे. हॉटेल, निर्धारित नियमानुसार त्यांना रात्री दीड वाजेपर्यंत परवानगी दिले जाते, मात्र तरी देखील त्यांच्याकडून नियम धाब्यावर बसवून रात्री उशिरापर्यंत हॉटेल, पब सुरू ठेवण्यात येतात.
मागच्या आठवड्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने विशेष मोहीम राबवून ही कारवाई करण्यात आली. मद्यविक्रीचा परवाना असलेल्या हॉटेल, पबना मद्यसाठा विक्रीच्या नोंदी ठेवणे बंधनकारक आहे. निर्धारित वेळेनंतर त्यांना मद्यविक्री करता येत नाही. अशा विविध नियमांचे उल्लंघन केल्याबाबत कारवाई करण्यात येते आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या-त्या विभागाची पथके सोडून इतर पथकांकडून गोपनीय पद्धतीने ही कारवाई केली जात आहे. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे.
एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांत राज्य उत्पादन शुल्क विभागाने तब्बल 13 कोटींचा अवैध मद्यसाठा आणि इतर मुद्देमाल जप्त केला आहे. भरारी, कार्यकारी विभाग आणि विशेष पथकांच्या माध्यमातून ही कारवाई केली आहे. मागील 8 महिन्यांत दारूची अवैद्य निर्मिती, वाहतूक, तसेच विक्री करणार्या 2 हजार 296 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये 2 हजार 455 जणांना अटक करण्यात आली आहे, तर 312 वाहने जप्त करण्यात आली आहेत. असा एकूण 13 कोटी 15 लाख 11 हजार 18 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे नियम तोडणार्या 8 जणांवर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी कारवाई केल्यानंतरदेखील ज्यांच्या वर्तनामध्ये सुधारणा होत नाही अशा अवैध दारू तयार करून विक्री करणार्यांवर ही कारवाई केली जात आहे. तसेच 42 जणांना स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. तर एका आरोपीला जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
महाराष्ट्र दारूबंदी कायदा, 1949 मधील कलम 93 नुसार दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असणार्या 359 जणांनी चांगल्या वर्तवणुकीची हमी दिली आहे. तर 190 जणांकडून विविध रकमेचे बॉण्ड घेण्यात आले. या बॉण्डच्या माध्यमातून 68 लाख 40 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. याचबरोबर दारूविक्रीची परवानगी नसलेल्या ठिकाणी दारूविक्री केल्याप्रकरणी 189 ठिकाणांवर कारवाई करण्यात आली असून, यात 433 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तर यातील 165 जणांना दंड करण्यात आला आहे. या 165 जणांकडून 5 लाख 51 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई उपअधीक्षक युवराज शिंदे, संजय पाटील, संतोष जगदाळे, निरीक्षक अशोक शितोळे, दीपक सुपे, राजाराम शेवाळे, अनिल पवार, प्रवीण शेलार, सुनील गायकवाड, संजय कोल्हे, अशोक कटकम यांच्या पथकाने केली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने नियमबाह्य पद्धतीने रात्री उशिरापर्यंत हॉटेल, पब सुरू ठेवणार्यांवर कारवाई येत आहे. मागच्या चार दिवसांत नियम मोडणार्या शहरातील 10 हॉटेल, पबवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातदेखील भरारी पथकांच्या माध्यमातून ही कारवाई सुरू आहे.
चरणसिंग रजपूत, राज्य उत्पादन शुल्क, अधीक्षक पुणे विभाग
हेही वाचा