वॉशिंग्टन : एकेकाळी कृष्णविवरांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले जात होते. कृष्णविवरांचे अस्तित्व केवळ सैद्धांतिक आहे, वास्तवात नाही, असेही काहीजण म्हणत असत. मात्र, आता कृष्णविवरांचे अस्तित्व केवळ सिद्धच झाले आहे असे नाही तर त्यांची छायाचित्रेही टिपण्यात यश आले आहे. एखादा शक्तिशाली तारा 'सुपरनोव्हा' या नावाने ओळखल्या जाणार्या मोठ्या विस्फोटानंतर मृत झाला की त्याचे रूपांतर प्रचंड आकर्षण शक्ती असलेल्या कृष्णविवरांमध्ये होत असते.
त्यांच्या या आकर्षण शक्तीपासून अगदी प्रकाशाचा किरणही सुटू शकत नाही. त्यामुळेच या अंधार्या पोकळ्या लपून राहत असतात. प्रत्येक आकाशगंगेच्या केंद्रस्थानी एक शक्तिशाली कृष्णविवर असते. आतापर्यंत अनेक कृष्णविवरांचा शोध लावण्यात आला आहे. मात्र, आता ज्ञात कृष्णविवरांपैकी सर्वात जुन्या कृष्णविवराला शोधण्यात खगोलशास्त्रज्ञांना यश आले. हे कृष्णविवर तब्बल 13 अब्ज वर्षांपूर्वीचे असून ते 'जीएन-झेड 11' नावाच्या आकाशगंगेच्या केंद्रस्थानी आहे. जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपच्या डेटानुसार 'बिग बँग' नंतर ते केवळ 44 कोटी वर्षांनी अस्तित्वात आले होते.
एका महाविस्फोटानंतर ब्रह्मांडाची सुरुवात झाली असे मानले जाते. हा महाविस्फोट 'बिग बँग' या नावाने ओळखला जातो. या घटनेनंतर म्हणजेच ब्रह्मांडाची सुरुवात होत असताना केवळ 44 कोटी वर्षांनंतर हे कृष्णविवर निर्माण झाले हे विशेष. त्यावेळीच ते एका आकाशगंगेच्या केंद्रस्थानी अस्तित्वात आले होते. ते इतक्या लवकर मोठे कसे झाले हे एक गूढच आहे.
केंब्रिज विद्यापीठातील खगोलशास्त्रज्ञ प्रा. रॉबर्टो मॅओलिनो यांनी याबाबतच्या संशोधनाचे नेतृत्व केले. त्यांनी सांगितले की हे कृष्णविवर इतके मोठे कसे झाले हीच सर्वात आश्चर्याची बाब आहे. या कृष्णविवराचे थेट छायाचित्र उपलब्ध नाही, कारण कोणताही प्रकाश कृष्णविवराच्या बाहेर येऊ शकत नाही. मात्र, खगोलशास्त्रज्ञांनी कृष्णविवराची अभिवद्धी (अॅक्रिशन) डिस्क, गॅस आणि धुळीच्या प्रभामंडळाच्या स्पष्ट संकेतावरून या गोष्टीचा छडा लावला की ते आपल्या चारही बाजूंनी वेगाने फिरत असते.
आकाशगंगेच्या केंद्रामध्ये त्याने विशालकाय रूप कसे घेतले हे समजून घेण्यास मदत होईल. आपल्या 'मिल्की वे' नावाच्या आकाशगंगेच्या केंद्रस्थानी असलेल्या कृष्णविवराचे वस्तुमान सूर्याच्या वस्तुमानापेक्षा अब्जावधी पट अधिक आहे. आपल्या आसपासच्या ग्रह-तार्यांना व अन्य खगोलांना गिळंकृत करून अशी कृष्णविवरे सतत वाढत असतात असे मानले जाते. मात्र, या नव्या कृष्णविवराच्या शोधाने जुन्या धारणा बदलू शकतात. 'जीएन-झेड 11' नावाच्या आकाशगंगेचा नव्याने अभ्यास केल्यावर हा शोध लागला.