बीजिंग : पुरातत्त्व संशोधकांनी चीनमध्ये 5300 वर्षांपूर्वीच्या भातशेतीच्या अवशेषांचा शोध घेतला आहे. ही शेती ज्याठिकाणी आढळली ते ठिकाण हेमुडू संस्कृतीशी निगडीत आहे. याठिकाणी प्राचीन काळातील प्रगत अशी जलसिंचन प्रणाली आणि यांगत्सी नदीच्या खालील भागातील लोकांचा एकमेकांशी असलेल्या संपर्काचे पुरावे शोधण्यात आले आहेत. चीनच्या इतिहासाशी संबंधित हा एक महत्त्वाचा शोध मानला जात आहे.
निंगबो म्यून्सिपल रिसर्च अॅकॅडमी ऑफ कल्चरल हेरिटेज मॅनेजमेंटच्या रिपोर्टनुसार सुमारे 1 हजार चौरस मीटर जागेत हा धान्यपिकाच्या पेरणीचा भाग आहे. नवपाषाण युगातील हेमुडू संस्कृती क्षेत्रातील केंद्रस्थानी असलेला हा भाग आहे. तिथे प्राचीन काळी महत्त्वाची मानवी वसाहत होती. उत्खननात पुरातत्त्व संशोधकांना तीन उंचवटे, नऊ खड्डे, भात आणि तणांच्या खुणा मिळाल्या. त्यांनी एक सिंचन व्यवस्था, पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था तसेच एक रस्ताही शोधला जो भातशेतीला शेजारच्या घरांशी जोडत होता.
याठिकाणी असलेल्या सिंचन व्यवस्थेला पाहून संशोधक चकीत झाले. भातशेतीच्या एका प्राचीन व्यवस्थेचा हा पुरावा आहे. हेमुडू संस्कृती निंगबोच्या हेमुडू शहराजवळ विकसित झाली होती. ही प्राचीन संस्कृती प्रगत भातशेती आणि अनोख्या उंच इमारतींसाठी प्रसिद्ध होती. यांगत्सी नदीच्या खालील क्षेत्रात ही संस्कृती फुलली.